आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात निवडक सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनावर बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोवा सरकार काही निवडक सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनावर बंदी घालणार आहे. राज्याचा अबकारी विभाग पुढील महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे, अशी माहिती या विभागाचे अधीक्षक सत्यवान भिवशेट यांनी गुरुवारी दिली.
राज्याला ‘कौटुंबिक पर्यटन स्थळ’ म्हणून सादर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. अलीकडेच राज्य अबकारी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून त्यात काही सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनावर बंदीचा समावेश आहे. अबकारी कर विभाग त्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत आहे. या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यापासून ही बंदी लागू होईल. पर्यटक काही सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालतात.

या बंदीमुळे हा गोंधळ टळेल, अशी माहिती भिवशेट यांनी दिली. अबकारी विभाग अशा स्थळांची यादी तयार करून ती अधिसूचित करेल. गोवा सरकारने या वर्षीच्या ऑगस्टमध्ये अबकारी कर कायदा, १९६४ मध्ये दुरुस्ती करून बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना १ हजार ते १० हजार रुपये दंडाची तरतूद त्यात करण्यात आली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर आणखी एक अधिकारी म्हणाला की, बंदी असलेल्या झोनमध्ये उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात येतील.

सर्वसामान्य नागरिकांना त्रास : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी हे दुरुस्ती विधेयक विधानसभेत मांडले होते. त्यात म्हटले होते की, मद्यप्राशन केल्यानंतर बाटल्या आणि कॅन इतस्तत: फेकलेल्या असतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. मद्यप्राशन केलेले लोक नंतर सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतात, शांततेला धोका पोहोचवतात. त्यामुळे तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो.
बातम्या आणखी आहेत...