आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३ तासांचा यशस्वी प्रवास: जयपूरहून लिव्हर दिल्लीत, पथकात उस्मानाबादचे डॉक्टर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - अलवर (जि. राजगड, राजस्थान) येथील एका 'ब्रेन डेड' मुलाने जयपूर आणि दिल्ली येथील दोघांना जीवनदान दिले. जयपूर येथे एका व्यक्तीला त्याची किडनी तर दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्समध्ये दहा वर्षांच्या मुलाला त्याच्या लिव्हरचे प्रत्यारोपण करण्यात आले. लिव्हर प्रत्यारोपण करणा-या डॉक्टरांच्या चमूत उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर येथील डॉ. श्रीधर सास्तूरकर यांचाही समावेश होता. लिव्हर दिल्लीला नेण्यासाठी जयपूर- दिल्ली राष्ट्रीय महामार्ग प्रथमच 'ग्रीन रोड कॉरिडॉर' करण्यात आला. त्यामुळे विशेष अॅम्ब्युलन्सने सहा तासांचा हा प्रवास तीन तासांत पूर्ण केला. ही घटना राजस्थानच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा झाल्यानंतरही राजस्थानातील रुग्णालयांमध्ये ही सुविधा नव्हती. मात्र, हा प्रयोग नुकताच यशस्वी करण्यात आला. राजस्थानात आजवर जिवंत दात्याच्या माध्यमातून किडनी प्रत्यारोपण केले जायचे. ब्रेन डेड व्यक्तीकडून होणा-या अवयव प्रत्यारोपणाला आरोग्य क्षेत्रात "कॅडवेरिक रिनल ट्रान्सप्लांटेशन' असे म्हटले जाते.

सहा तासांचा प्रवास तीन तासांत
*'लिव्हर' शरीरातून काढल्यानंतर केवळ सहा तास सुरक्षित राहू शकते. त्यामुळे त्याला लवकरात लवकर दिल्लीत पोहोचवणे गरजेचे होते.
*सकाळी ११ वाजता सीतापुरा येथील महात्मा गांधी रुग्णालयातून एक विशेष रुग्णवाहिका लिव्हर घेऊन दिल्लीकडे रवाना झाली. दोन पोलिस वाहने रुग्णवाहिकेच्या पुढे -मागे होती.
*जयपूर-दिल्ली महामार्गावरील रहदारी थांबवून रुग्णवाहिकेला मार्ग देण्यात आला. ती तीन तासांत दुपारी २ वाजता दिल्लीत पोहोचली.

जयपूरहून निघताच दिल्लीत ऑपरेशन सुरू
जयपूरमध्ये एका मुलाचे ब्रेन डेड झाल्याची माहिती मिळाली होती. आमच्या रुग्णालयात लिव्हरच्या आजाराने पीडित असलेला १० वर्षांचा अरबाजवर उपचार सुरू होते. विशेष अॅम्युलन्स महात्मा गांधी रुग्णालयाकडे पाठवण्यात आली. ब्रेन डेड घोषित झाल्यानंतर जयपूरमधील मुलाचे लिव्हर दिल्लीत आणण्यात आले. रुग्णवाहिका जयपूरकडे रवाना झाल्याचे कळताच दिल्लीत अरबाजचे ऑपरेशन सुरू केले. लिव्हर पोहोचताच रात्री २ वाजेपर्यंत ऑपरेशन करून त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. (दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्सचे मुख्य सर्जन डॉ. पाचेमा यांनी "दिव्य मराठी'ला दिलेली माहिती त्यांच्या शब्दांत.)

येथे झाले प्रत्यारोपण
राजस्थानातील महात्मा गांधी रुग्णालयात डॉ. टी. सी. सदामुखी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने ब्रेन डेड मुलाच्या किडनीचे प्रत्यारोपण एका व्यक्तीच्या शरीरात केले.डॉ. सदामुखी म्हणाले की, माझ्यासाठी रुग्णाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्याची प्रकृती चांगली झाल्यानंतर आम्हाला रुग्ण आणि ब्रेन डेड मुलाबद्दल माहिती देता येऊ शकते. या चमूत डॉ. सास्तूरकर यांच्यासह डॉ. सेंथीलकुमार यांचाही समावेश होता.

डॉ. श्रीधर सास्तूरकर
डॉ. श्रीधर वसंतराव सास्तूरकर (वय ३६) हे सास्तूर (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील मूळचे रहिवासी आहेत. दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर बिलियरी सायन्सेसमध्ये ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईमधून एमबीबीएस, कटकमध्ये एमएस केले. गतवर्षी दिल्लीतील लिव्हर ट्रान्सप्लांट व बिलियरी सायन्स इन्स्टिट्यूटमधून 'एमसीएच' (लिव्हर ट्रान्सप्लांट) झाले आहेत.

आरोग्य क्रांतीच
ही आरोग्य क्षेत्रातील मोठी घटना आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रकरणी विशेष नियम करून दिला.
राजेंद्र राठोड, आरोग्य मंत्री