आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Living Together It Not Means Adoption Says High Court

सोबत राहणे याचा अर्थ दत्तक घेणे नव्हे, हायकोर्टाने फेटाळली संपत्तीसाठीची याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या परिवारात राहणे म्हणजे त्यास दत्तक घेणे असे नव्हे किंवा ती व्यक्ती संबंधित परिवाराच्या संपत्तीवर दावाही करू शकत नाही, असा निकाल पंजाबच्या उच्च न्यायालयाने दिला आहे. चंदिगडमधील रोपडच्या एका युवतीने एका प्राध्यापकाच्या राजेशाही घरावर तसेच कोट्यवधीच्या संपत्तीवर दावा ठोकल्याप्रकरणी न्यायालयाने हा निकाल दिला.

प्राध्यापकांनी आपल्याला दत्तक घेतले होते, असा दावा अनुपम पुरी ऊर्फ रिंपी ऊर्फ नवदीप नामक युवतीने केला होता. दरम्यान, प्राध्यापक दिवाणचंद यांनी २४ जून २००९ रोजीच त्यांचे मृत्युपत्र बनवले होते. त्यात त्यांनी अनुपम पुरीला कधीही दत्तक घेतले नसल्याचा उल्लेख केला असून सर्व संपत्तीचे अधिकार पत्नी राज शाही यांनाच असल्याचे सांगितले आहे.

प्राध्यापकांच्या घरावर डोळा
चंदिगडमधील रोपडच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून निवृत्त प्राध्यापक दिवाणचंद शाही यांचे ६ नोव्हेंबर २००९ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी राज शाही (७३) यांनी पतीच्या नावावरील घर त्यांच्या नावे करण्यासाठी अर्ज केला. नोंदणी विभागाने नियमानुसार त्यावर आक्षेप मागवले. त्यावर अनुपम पुरीने या विभागात आक्षेप नोंदवत दिवाणचंद शाही यांनी तिला एक वर्षाची असताना दत्तक घेतल्याचा दावा केला.

न्यायालयाचा निकाल शाही यांच्या बाजूने
२२ ऑक्टोबर २०१३ रोजी हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले. अनुपमने त्यासाठी शाळेचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, बँक, रेशन कार्ड इत्यादी पुरावेही न्यायालयासमोर सादर केले. त्यात तिचा दिवाणचंद शाही यांची मुलगी असा उल्लेख आहे. दुसरीकडे, राज शाही यांनी हा दावा फेटाळत ती फक्त त्यांच्यासोबत राहायची, असे म्हटले. दत्तक घेण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया, अॅडॉप्शन सेरेमनी केली नसल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, गुरुवारी न्यायालयाने यावर निकाल दिला. फक्त सोबत राहणे याचा अर्थ दत्तक घेतले असा होत नाही, असे न्यायालयाने निकालात म्हटले.