मथुरा (उत्तर प्रदेश) - येथील सौख गावातील मुस्लिम मुलाने एका हिंदू मुलीला पळवून नेल्यानंतर बुधवारी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जाळपोळ आणि तोडफोडीनंतर दडपणाखाली आलेल्या 60 मुस्लिम कुटुंबांनी घरांना कुलूप लावून रात्रीतून पालायन केले आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात दिरंगाई केल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने पोलिस अधिक्ष मंजिल सैनी यांची तातडीने इटाव येथे बदली केली आहे. आता पोलिस महासंचालक लक्ष्मीसिंह या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. बुधवारच्या घटनेनंतर आज गावात तणावाचे वातावरण आहे. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस अधिक्षक कुमार राय यांच्या माहितीनूसार, 'पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाचे लोकेशन मिळाले आहे. ते अलाहाबादमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. पोलिसांनी हिंसा भडकवण्याच्या आरोपात 300 जणांना ताब्यात घेतले आहे. यातील चार आरोपींनी तुरुंगात टाकण्यात आले आहे.'
काय आहे प्रकरण
दोन मे रोजी सौख गावातील नईम त्याच्या हिंदू गर्लफ्रेंडसोबत गावसोडून गेला. त्यानंतर दोन्ही बाजूंचे लोक संतप्त झाले. त्यानंतर पळून गेलेले प्रेमीयुगुल बुधवारी शेजारच्या गावात सापडल्याचे सांगण्यात येते. त्यानतंर दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. या गोंधळातच दोघांनी डाव साधला आणि पुन्हा पळून गेले. पोलिसांच्या बेजबादारपणामुळे प्रेमीयुगुल पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या घटनेनंतर पंचायत बोलावण्यात आली. त्यात पोलिसांनाही बोलावण्यात आले. मात्र काही पोलिस कर्मचारी उपस्थित राहिले नाही. त्यानंतर गावात पुन्हा आगडोंब उसळला आणि रात्रीतून जाळपोळ व तोडफोडीच्या घटन घडल्या.