आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love On Facebook, Mobile Date, Bride Groom Disappeard

फेसबुकवर प्रेम, मोबाइलवर मुहूर्त, ऐनवेळी वधू गायब; नवरोबाला सासुरवाडी सापडली नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फगवाडा/ बंगा - मोबाइल, फेसबुक, चॅटिंग ही आजच्या युवा पिढीच्या संवादाची माध्यमे बनली आहेत. मात्र, कधी कधी या गोष्टीचा अतिरेक फार महागात पडतो. ग्रीसमध्ये राहणा-या एका भारतीय तरुणाच्या बाबतीत फसवणुकीची विचित्र घटना घडली. त्याचे फेसबुकवर एका युवतीशी प्रेम जुळले. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यावर त्यांनी मोबाइलवर तारीखही निश्चित केली. ठरल्याप्रमाणे विवाहाच्या दिवशी नवरदेव 40 कारमधून बँड, बाजा व व-हाडीसह वधूच्या गावातील घरी दाखल झाले; परंतु तेथे ना लग्नाची तयारी सुरू होती ना वधू, तिचे कुटुंबीय किंवा नवरीचा पत्ता होता. बंगा तालुक्यातील गोविंदपूर येथे राहणारा परमजित राम कलेर या युवकाच्या बाबतीत हा दुर्दैवी प्रकार घडला. तो वाजतगाजत फगवाडा गावात पोहोचला. तेथे सांगितलेल्या पत्त्यावर त्याने वधू व तिच्या नातेवाइकांचा शोध घेतला. पत्ता चुकला असेल म्हणून इतर ठिकाणी शोध घेतला. तेथेही निराशाच पदरात पडल्याने शेवटी व-हाडी मंडळी निराश होऊन रिक्त हातांनीच माघारी फिरली. तपास केला असता युवतीने दिलेला पत्ता व कुटुंबाची माहिती बनावट असल्याचे आढळून आले.


परमजित या युवकाचा फेसबुकवर संदीप कौर या युवतीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मोबाइलवर बोलणे झाल्यानंतर बुधवारी नकोदरा रोडवरील लाल किरण पॅलेस येथे विवाहाचा कार्यक्रम निश्चित झाला. त्यानुसार परमजित फगवाडा येथे आला; परंतु तेथे त्याच्यासोबत वरील प्रकार घडला. फसवणूक झाल्याने निराश झालेल्या परमजित राम कलेर याने सांगितले की, तो एक वर्षापूर्वी ग्रीसहून पंजाबमध्ये आला होता.


तपासणी केली असता पत्ता बनावट
दिव्य मराठी नेटवर्कने संदीप कौरच्या घराचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला असता तो पत्ता बनावट असल्याचे आढळून आले. गावचे सरपंच सतविंदर कौर यांचे पती सुरजितसिंह यांनी सांगितले की, संदीप कौर किंवा सुरिंदर पाल हीर या नावाने गावात कोणतेच कुटुंब राहत नाही. त्यांनी सांगितलेला पत्तादेखील बनावट आहे.


संदीप कौरची कहाणी
परमजितने सांगितले की, चार वर्षांपूर्र्वी ग्रीसमध्ये असताना फेसबुकवर त्याची ओळख संदीप कौरशी झाली. तिचे वडील दक्षिण आफ्रिकेत व्यवसाय करतात. भारतात आल्यावरही त्यांचे फेसबुकवर बोलणे होत होते. पंधरा दिवसांपूर्वी संदीप कौर गाडीतून फगवाडा येथे आली होती. तेव्हा तिने दूरवरून एक बंगला दाखवून तिथे ती राहत असल्याचे म्हटले होते. लग्नपत्रिका छापण्यासाठी तिने मुलाकडून 20 हजार रुपयेही काढून घेतले होते.