आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रविचित्र किस्से: नेत्यांसाठी पराठे केले, सतरंज्या टाकल्या;तिकीट मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - लोकांच्या अडीअडचणी सोडवणारे कार्यकर्ते तिकीट मिळवण्यासाठी दावा करतात, असे आपणास वाटत असेल. मात्र, विधानसभा निवडणुकीचे तिकीट मागणा-यांचा बायोडाटा पाहिल्यानंतर आपला भ्रमनिरास होऊ शकतो. दिव्य मराठी नेटवर्कने भाजप व कॉँग्रेसमध्ये आलेल्या बायोडाटाची पाहणी केली तेव्हा अनेक रंजक गोष्टी समोर आल्या.


कोणी जातीऐवजी पोटजातीच्या आधारावर तर कोणी भली मोठी सभा घेतल्याचा दावा करणारी छायाचित्र दाखवून तिकीट मागण्यासाठी सरसावला आहे. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी पराठे वा फुलके भाजल्याच्या नावाखाली तिकीट मागितले आहे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्यासाठी तुरुंगात गेल्याचा आश्चर्यकारक दावा काहींनी केला आहे. आमच्या कुटुंबात तीन पिढ्यांपासून संघाचा गणवेश घातला जातो, असे सांगत काही कार्यकर्त्यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे.


सरकारला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फटाके फोडले
राजीव गांधी यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये आपण दरवर्षी रक्तदान करत असल्याचे सांगत एका कॉँग्रेस कार्यकर्त्याने तिकीट मागितले आहे. कॉँग्रेस सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ब्यावर शहरामध्ये फटाके फोडले होते. माझा मालमत्तेचा व्यवसाय आहे, त्यामुळे मी ही निवडणूक सहज जिंकू शकतो. अध्यक्षांच्या आदेशानुसार नियंत्रण कक्षाचे काम सांभाळले होते, असे एकाने सांगितले.


माझ्या आजोबाने गांधीजींसाठी झाडू मारला होता
एका व्यक्तीने तिकीट मागण्यासाठी अनपेक्षित कारण सांगितले. आपण 40 वर्षांपासून पक्षाच्या कार्यक्रमात सतरंज्या टाकण्याचे काम करतो. महात्मा गांधी आमच्या गावात आले होते, तेव्हा आजोबांनी साफसफाई केली होती, असे नमूद करत तिकीट मागितले.


मी इंदिरा गांधींसाठी नऊ दिवस तुरुंगात होतो
ब्यावर मतदारसंघातून तिकीट मागणा-या स्थानिक नेत्याने वैयक्तिक माहिती देताना लिहिले की, डिसेंबर 1978 मध्ये जनता पार्टीने इंदिरा गांधींना तुरुंगात पाठवले होते, तेव्हा ते 170 सहका-यांसोबत 9 दिवस तुरुंगात होते.
700 बायोडाटा आतापर्यंत भाजपला मिळाले. एवढेच कॉँग्रेसलाही मिळाले.
4 महिन्यांवर निवडणूक आली आहे. बायोडाटाची संख्या हजारांत पोहोचेल.
5 हजारांहून जास्त बायोडाटा गेल्या निवडणुकीवेळी कॉँग्रेसला मिळाले होते.


आश्चर्यकारक छायाचित्रे
कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनाच्या छायाचित्राला उमेदवारी मिळवण्यासाठी आधार बनविले
> पोलिसांच्या लाठ्या खाताना
> सरसंघचालकांसोबतचे छायाचित्र
> प्रांत कार्यवाहकासोबतचे चित्र
> लाठीमारातील जखमी फोटो


बायोडाटा असा असावा
पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी कार्यकर्त्यांनी पाठवायच्या वैयक्तिक माहितीचे कोणतेही निकष नाहीत, असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रभान यांचे म्हणणे आहे. बायोडाटामध्ये वैयक्तिक माहितीव्यतिरिक्त पक्षासाठी काम, लोकपयोगी कामांचा थोडक्यात तपशील देणे आवश्यक आहे. यानंतरही कोणाचा दावा असेल तर त्याला अडवता येत नाही.