आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचा मुंबईवर दणदणीत पहिला विजय, अंकित बावणेचे नाबाद अर्धशतक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - येथे बुधवारी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने बलाढ्य मुंबईवर ६ गड्यांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा मराठवाड्याचा स्टार फलंदाज अंकित बावणे धावून आला. त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली.

नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. महाराष्ट्राच्या डोमिनिक मुथ्थास्वामीने अर्धा डझन फलंदाज बाद करत मुंबईला ४४.२ षटकांत २११ धावांवर रोखत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने ४८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर हर्षद खडीवाले अवघी एक धाव काढून बाद झाला. युवा फलंदाज विजय झोलने ३८ धावा करत थोडाफार संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहित मोटवाणी आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या अंकित बावणे यांनी शानदार अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रोहितने ८५ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. त्याला सौरभ नेतराळकरने पायचीत करत तंबूत पाठवले. गत सामन्यात शतक ठोकणारा अंकित बावणेने पुन्हा संघासाठी धावून आला. त्याने ८४ चेंडूंचा सामना करताना नाबाद ७८ धावा करत संघाला विजयी केले. या खेळीत त्याने ५ सणसणीत चौकार आणि २ षटकार खेचले. संग्राम अतीतकरने ३२ धावांचे मोलाचे योगदान दिले. मुंबईकडून शार्दूल ठाकूरने ३४ धावा देत दोन गडी बाद केले.

जाफरचे अर्धशतक व्यर्थ
मुंबईकडून सलामीवीर अखिल हवरडेकर ४४ तर आदित्य तारे एक धाव काढून बाद झाला. अनुभवी फलंदाज वसीम जाफरने जबाबदारीने खेळत ९९ चेेंडूचा सामना करताना ७ चौकार आणि ३ षटकार खेचत ८४ धावा काढल्या. त्याला मुथ्थास्वामीने विजय झोलकरवी झेल बाद करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर श्रेयस अय्यर १७ आणि सूर्यकुमार यादवने ४० धावा जोडल्या. इतर फलंदाजांनी निराशा जनक कामगिरी केली. महाराष्ट्राच्या डोमिनिक मुथ्था स्वामीने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने ८.२ षटकांत २५ धावा देत ६ फलंदाजांना तंबूत पाठवले.