हैदराबाद- बॉलिवूडची अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला हैदराबाद हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. मल्लिकाचा आगामी सिनेमा ‘डर्टी पॉलिटिक्स’चे एक पोस्टर लॉन्च झाले आहे. त्यात तिने अंगाभोवती राष्ट्रध्वज 'तिरंगा' गुंडाळल्याचे दाखवण्यात आले आहे. या पोस्टर विरोधात सामाजिक कार्यकर्ते टी. धनगोपाल राव यांनी ही याचिका दाखल केली आहे.
हायकोर्टाने राव यांच्या याचिकेची गंभीर दखल घेतली आहे. मल्लिकासह सिनेनिर्माते के.सी. बोकाडिया यांनाही नोटीस बजावली आहे. मल्लिका आणि बोकाडिया यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे राव यांनी याचिकेत म्हटले आहे.
'डर्टी पॉलिटिक्स'च्या पोस्टरमध्ये अभिनेत्री मल्लिकाने कमरेवर राष्ट्रीय ध्वज गुंडाळला आहे. तसेच ती एका लाल दीव्याच्या गाडीच्या टपावर बसलेले दाखवण्यात आले आहे. मल्लिका आणि निर्माते बोकाडिया यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे राव यांनी म्हटले आहे. या पोस्टरवर बंदी घालण्याचीही मागणी राव यांनी केली आहे.