कोलकाता - चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर बदलत चाललेल्या राजकीय समीकरणांमध्ये सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या दिल्ली भेटीसाठी रवाना झाल्या आहेत.
राज्याच्या काही प्रश्नांसाठी ही भेट असल्याचे ममता सांगत असल्या तरी काँग्रेसचे पानिपत झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. यापूर्वी त्यांनी देशात काँग्रेस आणि भाजपरहित प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची सत्ता असावी, अशी कल्पना मांडली होती. ममता मंगळवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जाऊन विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील. ममतांना केंद्रीय राजकारणाचे वावडे आहे. त्या विविध पक्षांच्या खासदारांच्या दिल्ली दौ-यात भेटीगाठी घेतील, असे तृणमूलचे सरचिटणीस मुकुल रॉय म्हणाले.