मलकानगिरी - गरिबीमुळे खायला अन्न नाही, आजारी पत्नीसाठी औषधे घेण्यासाठी जवळ छदामही नाही. या वंचनेला कंटाळून आजारी पत्नीच्या औषधासाठी एका आदिवासी व्यक्तीने
आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला फक्त ७०० रुपये आणि ५० किलो तांदूळ असा मोबदला घेऊन विकले. ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात फेब्रुवारीत घडलेला हा प्रकार शनिवारी उघडकीस आला.
चित्तापल्ली-२ या गावात सुकुरा मुदुली व पत्नी धुमुसीला सरकारच्या कुठल्याही दारिद्र्य निर्मूलन योजनेचा लाभ मिळत नव्हता. ‘उदरनिर्वाह व आजारी पत्नीसाठी औषध खरेदी करणे शक्य नव्हते. त्यामुळे मी मुलाला चित्तापल्ली-३ या गावातील एका ‘आशा’ कार्यकर्तीच्या सुपूर्द केले. त्याबदल्यात तिने मला औषध खरेदीसाठी ७०० रुपये आणि ५० किलो तांदूळ दिले,’ असे सुकुराने चौकशीत सांगितले. सुकुरा आणि त्याची पत्नी मुलाचे संगोपन करण्यात असमर्थ असल्याने तो सध्या आशा कार्यकर्तीच्याच ताब्यात आहे.