पाटणा - बिहारमधील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी जनता दल संयुक्त पार्टीचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी बंडाचा पवित्रा घेत स्वकीयांविरुद्ध आरपारच्या लढाईचे संकेत दिले आहेत. विधिमंडळ पक्षाच्या शनिवारी होणारी बैठक बेकायदा असल्याचा दावा मांझी यांनी केला असून
आपण २० फेब्रुवारी रोजी स्वतंत्र बैठक घेणार आहोत. त्यात आमदार म्हणाले तर आपण राजीनामा देऊ, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
जदयूमधील पेचप्रसंग गंभीर झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी शनिवारी बैठक बोलावली आहे. पक्षाच्या १११ आमदार आणि ४१ सदस्यांना तशी सूचना पाठवण्यात आली आहे. त्यात नितीश कुमार यांच्याकडे पुन्हा राज्याची सूत्रे सोपवण्यात येऊ शकतात. दुसरीकडे मांझी यांनी बंडाचा पवित्रा घेत शनिवारी दिल्लीत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावण्याचे ठरवले आहे. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
दरम्यान, जनता दलातील नितीश कुमार आणि मांझी यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी धुमश्चक्री उडाली. मांझी यांच्या समर्थकांनी काही भागात नितीश कुमार यांच्या समर्थकांवर हल्ले करून त्यांना पळवून लावले.