आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manohar Parrikar\'s Rape Remark \'insensitive\', Say Women\'s Group

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योग सुरू करणे बलात्कार सहन करण्याहून यातनादायक, मनोहर पर्रीकरांची मुक्ताफळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अकलेचे तारे तोडत नवाच वाद ओढवून घेतला आहे. कोणत्याही उद्योगपतीला एखादा उद्योग सुरू करताना बलात्काराच्या यातना सहन करणार्‍या महिलेपेक्षाही जास्त वेदना होतात, असे पर्रीकर म्हणाले. पर्रीकर यांच्या या विधानाचा महिला संघटनांनी खरपूस समाचार घेतला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

गोवा उद्योग संघटनेच्या कार्यक्रमात पर्रीकर यांनी हे अकलेचे तारे तोडले. ते म्हणाले, एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर तिला एकाच ‘इन्स्पेक्टर’च्या (पोलिस निरीक्षक) चौकशीला सामोरे जावे लागते, मात्र एखाद्याला उद्योग सुरू करायचा असेल तर मात्र त्याला 16 इन्स्पेक्टर्सना तोंड द्यावे लागते.’ या धक्कादायक विधानावरून वादंग माजताच त्यांनी आपण हे विधान विनोदाने केले, अशी पर्रीकरांनी सारवासारव केली. उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासंदर्भात आपण बोलत होतो, असे ते म्हणाले.

वादग्रस्त विधानावर महिला संघटनांचा आक्षेप
असंवेदनशीलतेचा कळस
पर्रीकर यांचे हे विधान असंवेदनशीलतेचा कळस असल्याचे ‘बाइलांचो साद’ या गोव्यातील प्रमुख महिला संघटनेच्या संयोजक सबीना मार्टिन्स यांनी म्हटले आहे. पर्रीकर यांनी बलात्कार पीडितांचा अपमान केला. बलात्कारपीडितेला केवळ एकाच निरीक्षकाला तोंड द्यावे लागत नाही तर तिला वारंवार तिच्यावर गुदरलेला प्रसंग सांगावा लागतो. उच्च् पदस्थांचाच बलात्कार पीडितांबद्दल असा दृष्टिकोन असेल तर खालचे नेते, नोकरशहा व पोलिसांत कोणता संदेश जाईल, असा सवाल त्यांनी केला.

यापूर्वीही ओढवून घेतला होता वाद
यापूर्वी गोव्यातील परमिट रूमची वेळ वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलने करणार्‍या महिलांबाबतही पर्रीकरांनी अशीच असभ्य भाषा वापरली होती. ‘प्रसिद्धीची खाज सुटलेल्या महिला हे आंदोलन करत आहेत,’ अशी टीका पर्रीकर यांनी केली होती.

चमत्काराची अपेक्षा करू नका
दरम्यान, मोदी सरकारकडून चमत्काराची अपेक्षा करू नका, असे पर्रीकर यांनी म्हटले आहे. ‘अच्छे दिन येणार होते, आले का?’ असे अनेक लोक मला विचारतात. ‘आले नाही, येत आहेत’ असे मी त्यांना सांगतो. मोदी सरकारकडून चमत्काराची अपेक्षा योग्य नाही, असे पर्रीकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या धक्कादायक विधानाचा नेमका अर्थ काय ?
गोव्यात एका महिलेला मारहाण करून तिच्या गुप्तांगामध्ये मिरचीपूड टाकण्यात आली होती. गोवा पोलिसांनी त्या महिलेची फिर्याद घेण्यासही नकार दिला होता. महिला संघटनांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि एफआयआर नोंदवून घेतला नाही म्हणून एका पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले. या घटनेला आठवडा उलटला नाही तोच पर्रीकर यांनी हे विधान केल्याने त्यातून सरकारची मानसिकता स्पष्ट झाली आहे, असे महिला संघटनांचे म्हणणे आहे.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)