आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादाचा रस: मांझींच्या बंगल्यातील आंब्यांवर नितीशकुमार यांचा खडा पहारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात आंब्यावरून वाद पेटला आहे. माझी यांच्या सरकारी बंगल्यातील आमराईत पोलिस तैनात करण्यात आल्याने आधीच उभय नेत्यांतील बिघडलेले संबंध आता अाणखीनच आंबट बनले आहेत.

मांझी यांच्या निवासस्थानी असलेली आमराईवर पोलिसांची खास कुमक तैनात आहे. हाच वादाचा रंजक विषय ठरला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मला भेटायला येणा-या लोकांना आंब्याचा रस चाखता येऊ नये म्हणून नितीश कुमार यांनी हा खटाटोप केला आहे, असा आरोप मांझी यांनी केला आहे. आमराईत २४ पोलिस तैनात आहेत. नियमानुसार मुख्यमंत्री निवासातील फळे-भाजीपाल्याचा वापर मुख्यमंत्री स्वत: करत नसल्यास ते विकून पैसे सरकारी तिजोरीत जमा केले जातात. दरम्यान, माझ्यासाठी आंबे नाही तर सामान्य माणसे महत्वाची आहेत, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे. बंगल्यातील आंबे नितीश यांनी खुशाल न्यावेत, असे मांझी म्हणाले.

दोन महिन्यांपासून मुक्कामी
मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर अजूनही मांझी १ अणे मार्गावरील निवासस्थानी राहतात. त्यांना दोन महिन्यांत निवासस्थान सोडण्याची सूचना देण्यात आली होती. त्यांना नितीश कुमार राहत असलेल्या ७ सर्कुलर रोडवरील बंगला हवा आहे. तो मिळाल्यानंतरच १ अणे मार्गावरील बंगला सोडू असा पवित्रा मांझी यांनी घेतला आहे.

फोन सुविधा कापली : मांझी यांनी बंगला सोडावा यासाठी त्यांच्या घराची दूरध्वनी सेवा, केबल सेवा कापून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जदयू-राजद-काँग्रेस एकत्र येणारच
राज्यात मांझी यांच्या निवासस्थानी असलेल्या आमराईवरून वाद सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासोबत बिहारची विधानसभा निवडणूक लढवू, मला युती होईलच असा ठाम विश्वास असल्याचे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे प्रतिनिधी भोला यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या भेटीनंतर दुस-याच दिवशी शरद यादवने ही भूमिका जाहीर केली आहे. युती होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला असला तरी त्यांनी कधीपर्यंत होईल याबाबत सांगण्यास नकार दिला. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, नितीशकुमार राजदसोबतच्या युतीच्या संभाव्य परिणामावर पक्षाच्या आमदारांची मते जाणून घेत असल्याने निर्णयास उशीर लागत आहे. त्यामुळे लालूप्रसाद चिंतित असून सोमवारी ते म्हणाले होते, वेळ हातातून जात आहे.

पर्यायावरही विचार : काँग्रेस-राजद युती न झाल्यास स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढण्याचीही तयारी राजद आणि जदयूने ठेवली आहे.