आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद, प्रचंड हल्लाबोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर शनिवारी झालेल्या नक्षली हल्ल्यांत १२ जवान शहीद तर ४ जखमी झाले. ही घटना छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात घडली. 

सुकमामध्ये भेज्जी पोलिस ठाण्याच्या परिसरात गस्तीवर असलेल्या ताफ्याला नक्षल्यांनी लक्ष्य करताना अंदाधुंद गोळीबार केला. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास कोटाचेरु गावाच्या वेशीजवळ हा हल्ला करण्यात आला. सीआरपीएफ २१९ बटालियनवर हा हल्ला झाला. गस्तीवर असलेल्या बटालियनमध्ये ११२ पोलिस होते. हल्ल्यानंतर नक्षलींनी घटनास्थळाहून १० शस्त्रे, दोन रेडिआे लांबवले. या भागात इंजराम-भेज्जी या मार्गाचे बांधकाम सुरू आहे. सुमारे ४५० किलाे मीटरचा हा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी तुकडीला दररोज डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे लागते. हल्ल्यानंतर घटनास्थळी काही वेळातच कोब्रा टीम दाखल झाली. त्यांनी शहिदांचे मृतदेह ताब्यात घेतले. तत्पूर्वी जखमींना भेज्जी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. निरीक्षक जगजित सिंह, सहायक उपनिरीक्षक एच.बी. भट, नरेंद्र कुमार सिंह, हेड कॉन्स्टेबल पी.आर. मिंडे, कॉन्स्टेबल मंगेश पाल पांडे, रामपाल सिंह यादव, गोरखनाथ, नंदकुमार पत्रा, सतिश कुमार वर्मा, के. शंकर, सुरेश कुमार अशी शहिदांची नावे आहेत. हेड कॉन्स्टेबल जगदीश प्रसाद विष्णोई, कॉन्स्टेबल जयदेव परमनाइक, सलीम यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, नक्षलींचे हल्ले वाढत चालले आहेत. नक्षलींनी हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे. 
 
महासंचालक नाही : केंद्रीय राखीव पोलिस दलाचा कारभार एक आठवड्यापेक्षा जास्त दिवसांपासून महासंचालकाशिवाय सुरू आहे. सरकारने अद्याप या पदावर नेमणूक केलेली नाही. २८ फेब्रुवारी रोजी के. दुर्गा प्रसाद निवृत्त झाले. त्यानंतर अद्यापही हे पद भरण्यात आले नाही.
 
प्रचंड हल्लाबोल
नक्षलींना यापूर्वी अनेकदा सुरक्षा दलास लक्ष्य केले होते. परंतु शनिवारचा हल्ला अतिशय नियोजित हल्ला होता. त्याचे स्वरूप भयंकर होते. नक्षलींनी हल्ल्याच्या परिसरात मोठ्या संख्येने स्फोटके पेरली होती. अगोदर स्फोट घडवण्यात आले. त्यानंतर लगेच तुफान गोळीबार करण्यात आला. सीआरपीएफ तुकडीवर असा प्रचंड हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 
 
पंतप्रधान मोदी, सोनियांचे सहवेदना
सुकमातील हल्ल्याची घटना दु:खद आहे. शहिदांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या. छत्तीसगडमधील हल्ल्याचा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निषेध केला. त्याचबरोबर सीआरपीएफच्या जवानांनी दाखवलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. हे उच्च बलिदान आहे, असे सोनिया यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.
 
घनदाट वनक्षेत्र : छत्तीसगडमधील भेज्जी हे घनदाट जंगली क्षेत्र आहे. कोट्टाचेरू गावाजवळ ते येते. वन क्षेत्राचा फायदा घेऊन माआेवादी नक्षलींनी हा हल्ला केला. अचानक झालेल्या तुफान गोळीबारानंतर जवानांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...