आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इफ्फीमध्ये मराठी चित्रपटांची धूम, ‘दारवठा’ हाऊसफुल्ल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोव्यात सुरू असलेल्या ४७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा तिसरा दिवस मराठी चित्रपटांनी गाजवला. भारतीय पॅनोरमा विभागात मंगळवारी एकाच दिवशी चार मराठी चित्रपटांची स्क्रीनिंग झाली. यात बहुचर्चित रिंगण, दारवठा, एक अलबेला आणि सैराट या चित्रपटांचा समावेश होता. अनेक महोत्सवांमध्ये गाजलेल्या ‘रिंगण’ने या महोत्सवातही छाप सोडली. एकूण २६२ चित्रपटांमधून या महोत्सवासाठी निवडल्या गेलेल्या या चित्रपटाने रसिकांना एका वेगळ्याच नात्याचे चित्रण दाखवले. सोबतच नवोदित दिग्दर्शक निशांत रॉय बोंबार्डेच्या ‘दारवठा’ या लघुपटाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या लघुपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचा बोर्ड लागला होता, तर चित्रपटगृहाच्या आत प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक गौतम घोष, कर्नाटक चित्रपटांचा युवा दिग्दर्शक पवन कुमारसह ‘सैराट’चा दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल साने आदी दिग्गजांनी हजेरी लावली होती.

‘सैराट’साठी रेड कार्पेट, मराठी चित्रपटाला पहिल्यांदाच मान : भारतीय पॅनोरमा विभागात ‘सैराट’ या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रादेशिक चित्रपटाची निवड करण्यात आली. चंदेरी दुनियेतील दिग्गजांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी सैराटची स्क्रीनिंग होती.
‘सैराट’चा दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि निर्माते निखिल साने यांच्यासाठी या वेळी रेड कार्पेट अंथरण्यात आली. विशेष म्हणजे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या मराठी चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी रेड कार्पेटचा बहुमान मिळाला आहे. अर्थातच अपेक्षेप्रमाणे या महोत्सवातही ‘सैराट’ने त्याची छाप सोडली, हे चित्रपटाला झालेल्या गर्दीवरून दिसत होते.

‘दारवठा’ : लैंगिक भावनांचा विलक्षण देखावा
मालिकांसाठी अनेक वर्षे काम केल्यानंतर निशांत राॅय बोंबार्डे हा नवोदित दिग्दर्शक लघुपटांकडे वळला. कोवळ्या वयातील लैंगिक भावनांवर आधारित त्याच्या ‘दारवठा’ या लघुपटाने समीक्षकांची वाहवा मिळवली. ४७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मंगळवारी दुपारी या लघुपटाचे हाऊसफुल स्क्रीनिंग झाले. पंकज नामक साधारण १०-१२ वर्षे वयाच्या बालकाची ही कथा असून नट्टापट्टा करण्यात, महिलांप्रमाणे कपडे घालण्यात तसेच नृत्यात त्याला विशेष रस असतो. मात्र, प्रतिष्ठेच्या नावाखाली जपल्या जाणाऱ्या गोष्टींचा त्यालाही त्रास होतो. प्रेमाच्या जुन्या आठवणींमध्ये गुदमरली गेलेली आई पंकजला जेव्हा या सर्व जोखडातून बाहेर काढते, तेव्हा दिला गेलेला संदेश हा समाजासमोर एक वेगळाच आरसा ठेवून जातो.

‘यू टर्न’चीही हवा
प्रयोगशील बंगाली दिग्दर्शक गौतम घोष यांच्या शंखोशील या चित्रपटाने प्रत्येकांच्या डोळ्यात पाणी आणले. भारत व बांगलादेश सीमेवरील नागरिक, जवानांच्या अडचणींचे यथार्थ चित्रण यात आहे. शिवाय, उड्डाणपुलावरील घातकी वळणामुळे होणाऱ्या अपघातांचे वास्तव चित्रण असलेल्या ‘यू टर्न’ या कर्नाटकी चित्रपटानेही आपली छाप सोडली.

समुद्रकिनारी ‘नटसम्राट’
४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बुधवारी सायंकाळी अत्यंत गजबजलेल्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर ‘नटसम्राट’ हा मराठी चित्रपट सादर होणार आहे. या सादरीकरणावेळी अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, महेश मांजरेकर आणि या चित्रपटाशी संबंधित अन्य कलाकारही उपस्थित असतील.
बातम्या आणखी आहेत...