आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 79.80 % Turnout In Second Phase Of Polling In West Bengal

बंगालच्या ५६ मतदारसंघांत सरासरी ७९.८० % मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये रविवारी ५६ विधानसभा मतदारसंघांत सरासरी ७९.८० टक्के मतदानाची नोंद झाली. हिंसाचाराच्या काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.
उत्तर बंगालमधील सहा जिल्हे आणि दक्षिण बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात सकाळपासून उत्साहात मतदान झाले. पहिल्या चार तासांत ५५.२८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तरुण, महिला मतदारांमध्ये जास्त उत्साह होता.

तृणमूल काँग्रेसचे वादग्रस्त नेते अणुव्रत मंडल हे मतदानासाठी गेले असताना त्यांच्या शर्टवर पक्षाचे निवडणूक चिन्ह होते. त्यामुळे वाद झाला. मंडल यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदवली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश हे कोलकात्यात होते. राज्यात अनेक ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेऊन बनावट मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केला.

माकप-तृणमूल कार्यकर्त्यांत चकमक
मालदा जिल्ह्यातील इंग्लिशबाजार विधानसभा मतदारसंघात एका मतदान केंद्रासमोर तृणमूल काँग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांत चकमक उडाली. या चकमकीत तृणमूलचा एक प्रतिनिधी जखमी झाला. माकपने केंद्र ताब्यात घेतल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधीने केल्यानंतर दोन्ही पक्षांत चकमक झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर लाठीहल्ला केला. त्यात तृणमूलचे प्रतिनिधी अनुप सरकार जखमी झाले. या प्रकारामुळे जवळपास ४५ मिनिटे मतदान थांबवण्यात आले. केंद्रीय दलाच्या जवानांनी परिस्थिती सुरळीत केल्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले.