आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध मोर्चासाठी तीन शहरांकडे कूच करा, फुटीरतावाद्यांचे आगीत तेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमध्ये उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला करून १८ जवानांना ठार मारल्यानंतर देशभर संतापाची लाट आली असतानाच फुटीरतावाद्यांनी राज्यातील असंतोषाच्या आगीत आणखी तेल ओतण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फुटीरतावाद्यांनी निषेध मोर्चाचे आयोजन अधिक जोमाने करण्याचे ठरवले असून, त्यांनी नागरिकांना बारामुल्ला आणि पुलवामाकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे.

फुटीरतावाद्यांनी उत्तर काश्मीर, बांदीपोरा आणि कुपवाडाच्या लोकांना लाँग मार्चसाठी बारामुल्लाकडे, दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील लोकांना पुलवामाकडे तर मध्य काश्मिरातील गंदेरबाल आणि बडगाम जिल्ह्यातील लोकांना श्रीनगरकडे येण्यास सांगितले आहे. त्यांनी आपला निषेधाच्या कार्यक्रमाची मुदत आता २२ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे.
पुलवामात संचारबंदी
काश्मीर खोऱ्यातील जनजीवन सलग ७३ व्या दिवशीही अशांत, अस्थिरच आहे. पुलवामात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातही संचारबंदीसदृश निर्बंधांमुळे लोकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. श्रीनगरमधील वरच्या भागातील बटमालूसह आता शोपियाँ आणि शहरातील ५ पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रासह बारामुल्लातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, बारामुल्लाचे एसएसपी इम्तियाज हसन यांनी याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, तिथे व जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली नाही. पोलिसांच्या सूत्रानुसार फक्त कायदा-सुव्यवस्था आणि सतर्कतेचा भाग म्हणून काही काळासाठी अधूनमधून फक्त संचारबंदी लावण्यात आलेली आहे.

प्रशासनाने संपूर्ण खोऱ्यातच जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप व शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंदच आहे. फक्त मध्य श्रीनगरच्या लाल चौक भागात मात्र खासगी कारची संख्या वाढलेली दिसली. बीएसएनएलची प्रीपेड सेवा सुरू आहे, पोस्टपेड तर बंदच आहे. इंटरनेट सेवाही सुरू नाही.
छायाचित्र: उरी येथील हल्ल्याच्या विरोधात जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयातील वकिलांनी सोमवारी निदर्शने केली.
बातम्या आणखी आहेत...