मेरठ - लालकुर्ती पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जामुन मोहल्ला भागात दोन मित्रांमध्ये मंगळवारी रात्री थट्टा-मस्करी सुरू होती. त्याचे भांडणात रुपांतर होऊन नंतर धार्मिक दंगल उसळली. पोलिसांनी उशिरा रात्री गुन्हा दाखल करुन आतापर्यंत 250 जणांना ताब्यात घेतले आहे. आज (बुधावार) सकाळपासून पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड करण्याचे सत्र पुन्हा सुरु केले.
काय होता वाद
लालकुर्ती भागातील जामुन मोहल्ला येथे मंगळवारी रात्री 10 वाजता काही मित्र बसलेले होते. त्यातील पिंटू वाल्मिकी आणि अज्जू यांची थट्टा-मस्करी सुरु होती. यांच्यातील भांडणाचेच नंतर धार्मिक दंगलीत रुपांतर झाले. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पिंटूने माचिसची काडी पेटवून अज्जूच्या चेहर्यावर फेकली. त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु झाले. भांडण एवढे वाढले, की अज्जूने फोन करुन त्याच्या इतर मित्रांना बोलावून घेतले. त्याच वेळी मस्जिदमध्ये नमाज अदा करुन लोक बाहेर येत होते. त्यांनी धार्मिक स्थळी आक्षेपार्ह्य टिप्पणी केल्याचा आरोप करुन घोषणाबाजी सुरू केली. पाहाता पाहाता दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरु झाली. थोड्या वेळाने त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या आल्या. त्यातच एका युवकाने गोळीबार केला आणि गोंधळ उडून पळापळ सुरु झाली. यात पाच लोक जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सीओ कँट आणि सिव्हिल लाइन पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. जमावाच्या दगडफेकीचा फटका पोलिसांनाही बसला. जमावाने पोलिसांवरही जोरदार दगडफेक केली. यात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही जमाव शांत होण्याचे नाव घेत नव्हता. अनेक तास लाठ्या-काठ्या आणि दगडफेक सुरु होती.
अनियंत्रित जमावाकडून वर्हाडाची बस जाळण्याचा प्रयत्न
अनियंत्रित जमावाने बडा बाजार भागासह हंडिया मोहल्ला येथे घरांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावावर नियंत्रण मिळवले. मात्र काहींनी वर्हाडाची एक बस जाळण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तो सुदैवाने तो यशस्वी होऊ शकला नाही. जिल्हाधिकारी पंकज यादव आणि पोलिस अधिक्षक ओंकार सिंह यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते देखील पोलिस फोर्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि रात्री उशिरापर्यंत दोन्ही समुदायांसी चर्चा करुन वाद मिटवण्याचे आवाहन करीत होते.
250 जणांवर नोंदवला गुन्हा
या दंगल प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा 250 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक्षकांनी बुधवारी पुन्हा दंगल उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन लालकुर्ती भागात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी छायाचित्र
(छायाचित्र : धार्मिक तणाव निर्माण करणार्यांवर लाठीचार्ज करणारे पोलिस)