आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघालयातल्या दवानमुळे शेतकऱ्यांचा पैसा झाला मोठा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिलॉँग - ‘गरज ही शोधाची जननी आहे’, असे म्हणतात. कमी शिकलेली माणसंही आपल्या गरजांना अनुसरून योग्य मार्ग काढत स्वतः यशस्वी होतात व इतरांना मार्ग दाखवितात. मेघालयातील एका छोट्याशा खेड्यातील दवान खरीम या तरूण शेतकऱ्याने धान्य उफणण्याचे हातचलित यंत्र (हँन्ड ऑपरेटेड विन्नोवर) स्वतः वापरून आपला आणि शेतकरी बांधवांचा खर्च आणि त्रास वाचविला.

दवानच्या या शोधक वृत्तीमुळे त्याचा स्वतःचा आणि आसपासच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला शिवाय हे यंत्र भाड्याने देत असल्याने दवानला अतिरिक्त उत्पन्नही मिळू लागले. दवानच्या या शोधक वृत्तीमुळे देशभराताली शेतकऱ्यांना स्वस्तात धान्य उफणनारे यंत्रही मिळाले.

पारंपरिक पद्धतीने धान्याची उफणनी करताना वाऱ्यावर विसंबून रहावे लागत होते. शिवाय पाच ते सहा मजुरांचा अधिकचा खर्च शेतकऱ्याच्या बोकांडी बसे तो निराळाच. दवान खरीम हा देखील या त्रासामुळे हैराण होता. त्याची शेतजमीन होती केवळ दीड एकर. भात हे मुख्य पीक. त्याची जमीन चढउताराची आहे. डोंगरी भागात या शेतीला पर्वतीय शेती म्हणतात. भाताचे चांगले उत्पादन येऊनही दवानची शेती दरवर्षी तोट्यातच असायची. छोट्या शेतकऱ्याला धान्य तयार करण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने तिफणीवर उभे राहून धान्य वाऱ्याच्या दिशेप्रमाणे उफणावे लागत होते. या प्रक्रियेत वारा नसला तर वारा येईपर्यंत थांबून राहावे लागत असे. आधुनिक यंत्रसामग्री छोट्या शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याचे दवानसारख्या शेतकऱ्यांना फार मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. पारंपरिक कामासाठी अतिरिक्त मजुरही लागायचे. ते तर अजिबात न परवडणारे होते! यात व्हायचे असे की उत्पन्नाचा बराचसा बाग मजुरीतच घालवावा लागे. शिवाय धान्य व्यवस्थित साफ होत नसल्याने त्यात खडे व माती शिल्लक राहून त्याचा परिणाम बाजारभाव कमी मिळण्यात व्हायचा.

दवानचे आपल्या अडचणी अनेकांपुढे मांडल्या. कृषी विभागाचे उंबरठे तो झिजवू लागला. आपली अडचण तो त्या सर्वांपुढे मांडत राहिला. ‘आयसीएआर’च्या कृषि अवजारे विभागाने अखेर त्याची दखल घेतली. दवान याच्याकडून माहिती घेत तंत्रज्ञांनी वारा नसतानाही धान्य उफणण्याचे यंत्र विकसित केले. हे यंत्र म्हणजे लोखंडी गोलाकार पट्टी पंख्याचे पाते, चेन आणि स्पोकेटच्या सहाय्याने बनविले आहे. एक व्यक्ती हा पंखा फिरवू शकतो. या यंत्राचे वजन केवळ २९ किलो आहे. अपघात होऊ नये म्हणून या यंत्राला गार्डही बसविले आहे. दवान याने हे यंत्र ‘आयसीएआर’कडून ३००० रूपयांना खरेदी केली. या यंत्राचा त्याला प्रचंड फायदा झाला. त्याचा तांदुळ कमी मेहनतीत व खर्चात तयार झाला. त्याच्या मित्रांनी या यंत्राचा उपयोग केला. त्यांनाही फायदा झाला. त्यानंतर अनेक शेतकरी दवानकडून हे यंत्र भाड्याने नेऊ लागले. त्याला वर्षाकाठी आठ-दहा हजारांचे उत्पन्नही अतिरिक्त मिळाले. दवानच्या या उपक्रमशिलतेची दखल घेऊन ‘आयसीएआर’ने त्याला अन्य कृषी यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. नवनव्या यंत्रांसह दवान आपल्या बांधवांचा आर्थिक फायदा आणि उत्पादन वाढीसाठी झटतो आहे.