आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Meghalaya Flood Toll 52, Rajnath Singh Will Cisi On Oct 1

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेघालय : अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे 52 जण मृत्यूमुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : मेघालयमध्ये पूर आल्यानंतर वाढलेली पाण्याची पातळी.
गुवाहाटी/शिलाँग - आसाम आणि मेघालयात आलेल्या भीषण पुराने एकूण 85 जणांचा बळी घेतला आहे. त्यापैकी 52 जणांचा मृत्यू एकट्या मेघालयमध्ये झाला आहे. एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत 30 हजारहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह 1 ऑक्टोबरला आसाम आणि मेघालयच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.
मेघालयचे उपमुख्यमंत्री रोतरे सी लालू यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. मृतांमधअये गारो हिल्स परिसरातील अधिक नागरिकांचा समावेश आहे. तर परिसरातील रस्ते, पूल, घरे आणि शेती पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे चित्र आहे.
राज्याला या संकटामुळे सुमारे दोन हजार कोटींचे नुकसान झाल्याचे लालू यांचे म्हणणे आहे. यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच नुकसानीची आकडेवारी समोर येणार असल्याचे मत त्यांनी मांडले. मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी केंद्राकडे मदतीसाठी 2000 कोटींच्या पॅकेजची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
मेघालयमध्ये ब्रह्मपुत्र आणि जिंगिरम नद्यांमध्ये आलेल्या पुरामुळे राज्यातील सुमारे 1100 गावांना थेट फटका बसला आहे. तर दहा हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सरकारने पूरग्रस्त भागांमध्ये 85 मदत छावण्या तयार केल्या आहेत. पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील राजबाला, चिबिनांग, सेल्सेला, टिकरिकिल्ला, चरबाटपाडा आणि पुशकुरनिपरा हे भाग अजूनही पाण्याखाली असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

रिजीजू यांचा दौरा
सोमवारी गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांच्याबरोबर दोन्ही राज्यांची हवाई पाहणी केल्यानंतर एनडीआरएफ प्रमुख ओपी सिंह म्हणाले की, आसाममध्ये 33 तर मेघालयमध्ये 52 जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही आता मदतकार्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमा यांचीही भेट घेतली
रिजीजू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मुकुल संगमा आणि ज्येष्ठ नेते व खासदार पी.ए. संगमा यांचीही भेट घेतली. तसेच दोन्ही राज्यांमधील वरीष्ठ अधिका-यांकडून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. रिजीजू यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह 1 ऑक्टोबरला आसाम आणि मेघालयातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पूरस्थितीचे PHOTOS