आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारतमाता की जय’ न म्हटल्याने बिहारच्या मंत्र्याचा पत्रकारांवर रोष; माफीही मागितली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमधील भाजपचे मंत्री विनोदकुमार सिंह हे पत्रकारांवर धावून गेल्याने नव्याच वादाला तोंड फुटले आहे. पत्रकारांनी ‘भारतमाता की जय’ घोषणा न दिल्याने ते निश्चितच पाकिस्तानधार्जिणे असावेत, असे विनोदकुमार म्हणाले. एका कार्यक्रमानंतर त्यांनी ‘भारत माता की जय’ घोषणा दिल्या. त्यांच्या मागे सर्व उपस्थित भाजप समर्थकांनी भारतमातेचा जयघोष सुरू केला. यात काही माध्यम प्रतिनिधींनी याला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी विनोदकुमार यांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. विनोद हे बिहार सरकारमध्ये खनिकर्म मंत्री आहेत.  

संकल्प संमेलनात भाषण केल्यानंतर त्यांनी भारतमातेचा जयघोष केला. पत्रकारांनी जयघोष न केल्याने ते पाकिस्तानचे पुत्र व कन्या असल्याचा आरोप विनोदकुमार यांनी केला. सामूहिक घोषणाबाजीत पत्रकार सामील न झाल्याने मंत्र्यांना ते खटकले. तुम्ही आधी भारतमातेची मुले आहात आणि नंतर पत्रकार, हे ध्यानात ठेवा, असे विनोदकुमार यांनी सुनावले. कटिहार जिल्ह्यातील प्राणपूर मतदारसंघाचे ते लोकप्रतिनिधी आहेत. 

या संकल्प संमेलनाला उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांचीही उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्षांनी विनोदकुमार यांच्या वक्तव्यांविषयी नाराजी व्यक्त करत पत्रकारांची माफी मागितली. त्यानंतर विनोदकुमार यांनीदेखील, आपण असे भावनेच्या भरात केल्याचे म्हटले. त्यांनी माध्यम प्रतिनिधींची माफी मागितली. प्रदेशाध्यक्षांनी प्रसंगावधान ठेवल्याने येथील वाद वेळीच नियंत्रणात आला. विनोदकुमार यांनी स्पष्टीकरण दिले की, सभेमध्ये आपण भारावून गेलो होतो. त्या भरात आपण माध्यम प्रतिनिधींना बोललो. 
बातम्या आणखी आहेत...