आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींकडे लोकसभा प्रचारमोहिमेची सूत्रे; गोव्यात घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचार मोहिमेची धुरा नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अडवाणी यांचा विरोध झुगारून भाजपने मोदींना निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी विराजमान केले. भाजपच्या कार्यकारिणी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रविवारी समारोप सत्रात पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदींच्या नावाची घोषणा केली.


हा निर्णय सर्वसंमतीने झाला असल्याचे दाखवण्यासाठी पत्रकार परिषदेत राजनाथ, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि वेंकय्या नायडू आदी नेते उपस्थित होते. समारोपानंतर मोदी यांनी जाहीर सभा घेत यूपीए सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. दुसरीकडे, अडवाणी यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जयपूरमधील एका सभेला संबोधित केले.


सूत्रांनुसार, मोदींच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी राजनाथ यांनी अडवाणींना फोन करून त्याची माहिती दिली. नंतर कार्यकारिणीत त्याची अधिकृत घोषणा झाली. अडवाणींनी आपल्याला आशिर्वाद दिल्याचे मोदींनी ट्विटरवर सांगितले.


‘भारत निर्माण’वर संशय
मोदी म्हणाले, केंद्रातील यूपीए सरकार भ्रष्टाचारप्रूफ झाले आहे. त्यांच्या आरोपांचा कोणताही परिणाम होत नाही. आता ते ‘भारत निर्माणवर हक्क आहे माझा’ अशा अब्जावधी रुपयांच्या जाहिराती देत आहे. मात्र लोक म्हणतात - भारत निर्माणवर संशय आहे माझा. गोवा माझ्यासाठी नेहमीच फलदायी ठरले आहे. 2002 मध्ये गोव्यातील अधिवेशनातूनच त्यांना नेतृत्व कायम ठेवण्यासाठी हिरवा कंदील मिळाला होता.


मार्ग खडतर
अडवाणी यांचा विरोध पाहता मोदी यांच्यासाठी पुढील मार्ग आणखीच बिकट आणि अडीअडचणींनी भरलेला असेल. कार्यकारिणील वरिष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनीही मोदींच्या अतिस्तुतीवर भाजपला घरचा आहेर दिला आहे. सुषमा स्वराज यांनीही उघडपणे मोदींचे समर्थन केलेले नाही.


मोदींसमोरील आव्हाने
० निवडणूक मोहीम समितीची उभारणी
० राष्‍ट्रीय नेत्यांसोबत देशव्यापी निवडणूक रणनीती तयार करणे
० उमेदवारांची प्राथमिक यादी व निवडणूक प्रक्रियेत थेट दखल
० गुजरातचे मुख्यमंत्रिपद आणि पक्षाची राष्‍ट्रीय जबाबदारीही सांभाळणे
० निवडणूक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विविध राज्यांचा दौरा करावा लागणार
० बिहारमध्ये निवडणुकीच्या उद्देशाने जदयूसोबत ताळमेळ बसवणे


पीएमपद उमेदवारीचा मार्ग मात्र मोकळा नाही
निवडणुकीची सूत्रे हाती आली असली तरी मोदींच्या पीएमपद उमेदवारीचा मार्ग मात्र मोकळा झालेला नाही. त्यांची आजची निवड हा संसदीय बोर्डाचा निर्णय नाही. पीएमपदाचा उमेदवार किंवा सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याची घोषणा करण्याचा अधिकार आजही संसदीय बोर्डाकडेच आहे.