आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Modi Will Address One Lakh Supporters In Hyderabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: हैदराबादमध्ये नरेंद्र मोदी तेलगूत म्हणाले, सोधरा, सोधरी, मनोलारम, नमस्‍कारम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख झाल्यानंतर प्रथमच दक्षिण भारताच्या दौ-यावर आलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतीयांच्या मनात घर करण्यासाठी तेलगू भाषेत भाषणाला सुरूवात केली. त्यांच्या या तेलगू बोलीला उपस्थितांनी टाळ्या वाजवून आणि हात उंचावून प्रतिसाद दिला. त्यानंतर मोदींनी हिंदीमधून उपस्थितांशी संवाद साधत केंद्र सरकार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला बोल केला.

मोदी म्हणाले, की पाकिस्तान भारतीय सीमेवर येऊन आपल्या पाच सैनिकांचा बळी घेतो, दुसरीकडे चीन घुसखोरी करतोय, असे असताना केंद्र सरकार काय करीत होते? जम्मू-काश्मिरमधील किश्तवाडमध्ये जातीय दंगली सुरु आहेत. भाजपचे नेते अरुण जेटली तेथील जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी गेले असता तेथील सरकारने त्यांना जम्मू विमानतळावरच अडविले. त्यांना किश्तवाडमध्ये का जाऊ दिले गेले नाही, असा प्रश्न उपस्थित करून मोदींनी या दंगली मागे काही कट तर शिजत नाही ना, अशी शंका व्यक्त केली.

चीनची घुसखोरी न रोखता आणि चीन सरकारला कडक शब्दात न सुनावता भारताचे परराष्ट्रमंत्री त्यांची स्तूती करतात असे सांगून मोदींनी केंद्रावर टीका केली. अशा सरकारला सत्तेत राहाण्याचा काहीही हक्क नसल्याचे ते म्हणाले.

आंध्रप्रदेशमधील शेतक-याच्या आत्महत्येवर मोदींनी सरकार काय करीत आहे, असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, की महाराष्ट्रात आणि आंध्रप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सर्वाधिक शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. राज्यातील तरुणांच्या हाताला रोजगार नाही. ते आखाती देशांच्या दिशेने निघाले आहेत. असे असताना येथील सरकार आणि खासदार काय करीत आहेत?

तत्पूर्वी मोदींचे हैदराबादमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शहरात सगळीकडे 'नवी उमेद, नवा विचार' असे बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यानंतर भरगच्च लालबाहादूर शास्त्री मैदानात मोदींनी प्रवेश केला. यावेळी मंचावर पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि आंध्रप्रदेश भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. पुष्पहार आणि स्मृतीचिन्ह देऊन हैदराबाद भाजपकडून मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. या सभेला एक लाखांपेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. विशेष म्हणजे या सभेसाठी भाजपकडून पाच रुपये तिकीट लावण्यात आले होते. याची रक्कम उत्तराखंडमधील पीडितांना पाठविली जाणार आहे.