आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्यांमुळेच तणाव;मुरादाबाद पोलिस अधीक्षकांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरादाबाद - उत्तर प्रदेशात मुरादाबादमध्ये प्रशासन व भाजप नेत्यांमधील तणावपूर्ण परिस्थिती सलग दुसर्‍या दिवशीही कायम राहिली. मुरादाबादच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहरातील अशांततेला भाजपचे नेतेच जबाबदार असल्याचा आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. केंद्र सरकारने अधिकार्‍याच्या विधानाची गंभीर दखल घेत एक पोलिस अधिकारी अशा स्वरूपाचे वक्तव्य कसे काय करू शकतो, अशी विचारणा करत पोलिस अधीक्षकांवर (एसएसपी) ते राज्यातील सत्ताधारी समाजवादी पार्टीचे राजकीय एजंट असल्याचा आरोप केला आहे.

मुरादाबादमध्ये कांठ येथील एका धार्मिक स्थळी लावलेले लाऊडस्पीकर पोलिसांनी आत घुसून उतरवले होते. या कारवाईविरोधात भाजपचे खासदार सर्वेश सिंह यांनी शुक्रवारी महापंचायतीचे आयोजन केले होते. ही महापंचायत उधळून लावण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांना मोठय़ा प्रमाणावर बळाचा वापर करावा लागला होता. पोलिसांनी भाजप नेते, कार्यकर्त्यांवर अर्शुधूर व लाठीमार केल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यात उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जखमी झाले असून त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार संगीत सोम यांना ताब्यात घेतले. त्यावरून शहरात शनिवारीही तणावाची परिस्थिती कायम होती. त्याची माहिती देताना वरिष्ठ पोलिस आयुक्त धर्मवीर यांनी भाजप नेते पोटनिवडणुकीआधी तणाव निर्माण करून ध्रुवीकरण करू इच्छित असल्याचा आरोप केला. धर्मवीर यांच्या वक्तव्याआधी समाजवादी पार्टीचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनीही असाचा आरोप केला होता. राज्यातील धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवून भाजप त्याचा राजकीय लाभ उठवू पाहत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.

काँग्रेसला हवे पंतप्रधान मोदींचे स्पष्टीकरण : काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ओढले आहे. या वादावर पंतप्रधान का गप्प आहेत? त्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे. भाजपचे स्थानिक आमदार संगीत सोम निवडणुकीचा लाभ घेण्यासाठी महापंचायत भरवू इच्छित होते. मुजफ्फरनगर दंगलीतही त्यांचा हात होता. देश महापंचायतीशिवाय चालू शकत नाही काय, अशी विचारणा सिंघवी यांनी केली आहे.
अधिकार्‍यावर भाजप भडकला
दरम्यान, धर्मवीर यांचे विधान भाजप नेत्यांना चांगलेच झोंबले. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी धर्मवीर यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अशा स्वरूपाची वक्तव्ये करू नयेत. ते प्रशासनाचा एक भाग आहेत, असे व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे.

(फोटो - शुक्रवारी महापंचायत उधळून लावण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांना मोठय़ा प्रमाणावर बळाचा वापर करावा लागला)