आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Moradabad VHP Plan Jal Abhishek Kanth Temple Sadhvi Prachi Arrested

उत्तर प्रदेश : कांठमध्ये तणाव, कलम 144 लागू; साध्‍वी प्राची यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ/मुरादाबाद - उत्‍तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील काठ येथे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. विश्‍व हिंदु परिषद (व्हिएचपी) च्या 'जलाभिषेक' आणि आणखी एका मंदिरावर लाऊड स्पीकर लावण्याच्या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनाने या परिसरात कलम लागू केले आहे. तर जलाभिषेक करायला जाणा-या साध्वी प्राची यांना बिजनोरच्या भगुआलामध्ये अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसही कांठमध्ये शनिवारी एक शांती मार्च काढणार आहे. या सर्व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुरादाबाद आणि त्याच्या आसपासच्या परिसरांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

साध्‍वी प्राची यांना अटक
साध्‍वी प्राची हरिद्वारहून कांठकडे येत असाताना त्यांना अटक करण्यात आली. कांठमध्ये लाऊडस्पीकर लावू न दिल्यामुळे आणि चार जुलैला होणारी महापंचायत रद्द केल्यामुळे त्यांनी मौनव्रत घेतले होते. त्यावेळीच त्यांनी 25 जुलैला कांठच्या मंदिरात जलाभिषेक करून व्रत सोडणार असल्याची घोषणा केली होती.

कांठमध्ये कलम 144
व्हिएचपीच्या या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आधीच सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती. मुरादाबादचे जिल्हाधिकारी दीपक अग्रवाल यांनी सांगितले की, कलम 144 लागू असल्याने प्रशासनाच्या वतीने कोणालाही आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कायदा हातात घेणा-यांवर कडक कारवाई केली जाईल.

लाऊडस्पीकर काढल्याने झाला वाद
कांठ परिसरात अकबरपूर गावातील मदिरातून लाऊडस्पीकर काढल्यानंतर पोलिस आणि स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भाजपने या मुद्यावर महापंचायत बोलावण्याची घोषणा केली. प्रशासनाने मात्र त्यासाठी परवानगी दिली नाही. त्यानंतर नाराज झालेल्या संघटनांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर आंदोलक आणि पोलिस आपसांत भिडले होते. त्यानंतर आंदोलकांनी दगडफेक केली तर त्याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला होता. या संपूर्ण हिंसाचारात डीएम चंद्रकांत यांच्यासह अनेक अधिकारी जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हिंसाचारामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, गोंधळ घातल्या प्रकरणी दोन जिल्हाध्यक्षांसह 62 कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे.

महापंचायतीसाठी येणारे संभलचे खासदार सतपाल सिंह सैनी, रामपूरचे खासदार नेपाल सिंह, अमरोहाचे खासदार कंवर सिंह आणि आमदार संगीत सोम यांच्यासह शेकडो भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सर्वांना मुरादाबाद येथील पोलिस लाईनमध्ये थांबवण्यात आले होते.
फाइल फोटो : साध्वी प्राची