आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलायम म्हणाले- अखिलेशसोबत भांडण नाही, मात्र CM उमेदवार निवडणुकीनंतर ठरेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा कोणताही चेहरा समोर करण्यात येणार नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय पक्षाचे आमदार घेतील, असे समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी मुलायम यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत ही घोषणा करून पक्ष तसेच कौटुंबिक वादावरील भूमिका स्पष्ट केली. व्यासपीठावर त्यांचे बंधू शिवराजसिंह, वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती होते. मात्र अखिलेश यादव यांची उपस्थिती नव्हती. मुलायम म्हणाले, निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पक्षाकडून कोणताही चेहरा नसेल. त्याची निवड करण्याचा अधिकार आमदारांचा आहे. आमचा आहे. हे मीडियाचे काम नाही. अखिलेश यादव हेच आगामी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार का, या प्रश्नावर मुलायम बोलत होते. कौटुंबिक वादावर ते म्हणाले, आमच्या कुटुंबात कसलाही वाद नाही. शिवपाल सकाळीच अखिलेशला भेटले. गेल्या निवडणुकीत माझ्या नावावर मते मिळाली होती. तेव्हा मी अखिलेशला मुख्यमंत्री केले होते. ‘किसे कहां बैठाना है, हम खुद तय करेंगे, ’ असे त्यांनी आपल्या शैलीत सांगितले. बेकायदा खाणीच्या प्रकरणात आरोप असलेले गायत्री प्रजापती या मंत्र्यावर मुलायम यांनी स्तुतिसुमने वाहिली. प्रजापती निर्विवाद नेते आहेत. पक्षाबद्दल त्यांची बांधिलकी वादातीत आहे. ४ नोव्हेंबर रोजी पक्ष स्थापनेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रजापती काम पाहणार असल्याचे मुलायम यांनी या वेळी जाहीर केले.
कौमी एकता दलाच्या विलीनीकरणावेळी संघर्ष : कौमी एकता दलाच्या सपातील विलीनीकरणावेळी सपामधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. हे विलीनीकरण रद्द करण्याचा निर्णय अखिलेश यांनी घेतला होता. त्यानंतर अखिलेश यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या अखिलेश यांचे समर्थक, विधान परिषदेचे आमदार यांनी मुलायम यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुलायम यांनी आपले बंधू शिवपाल यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
समान नागरी कायद्याचा निर्णय धार्मिक नेत्यांवर सोडा
समान नागरी कायद्याचा निर्णय धार्मिक नेत्यांवर सोडला पाहिजे. या मुद्द्यावर मला जास्त काही बोलायचे नाही. परंतु देश आणि मानवतेसाठी सर्वांनी एकजुटीने राहिले पाहिजे, असे मला वाटते. फार पूर्वीदेखील हा विषय एकदा चर्चेत आला होता. समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांचा पुण्याजवळ एक कार्यक्रम होता. तेव्हा त्याची चर्चा झाल्याचे मला आठवते. तेव्हा हिंदू व मुस्लिम यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतरही लोहियांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी होती. कुराण, गीता, रामायण यातून आपल्याला मानवतेची शिकवण मिळते. प्रत्येकाने धर्माच्या दोरीच्या साह्याने एकजुटीने राहायला हवे. त्यांच्या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी त्या गावातील जातीय तणाव दूर झाला, असा किस्सा मुलायम यांनी पत्रकारांना सांगितला.
बातम्या आणखी आहेत...