लखनौ- समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायम सिंह यादव यांची धाकटी स्नूषा अपर्णा यादव यांनी गोमांस (बीफ) प्रकरणी टिप्पणी दिली आहे. 'गाय ही आमची माता आहे. त्यामुळे गोमांस खाणे योग्य नसल्याचे अपर्णा यादव यांनी मंगळवारी केलेल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. अपर्णा या मुलायम यांचे धाकटे पुत्र प्रतीक यादव यांची सहचारिणी आहे.
'गाय आमची माता आहे. गाईची मांस खाणे योग्य गोष्ट नाही. देशात गायींची कत्तल थांबली नाही तर भविष्यात हिंदुस्तान हा तालिबान म्हणून ओळखला जाईल. माझे मत एका विशिष्ट धर्मासाठी नसून गोसंवर्धनसाठी आहे. त्यामुळे त्याचा विपर्यास करु नये.', असे अपर्णा यादव यांनी 'ट्वीट'मध्ये म्हटले आहे.
आझम खान यांना सपोर्ट..
बीफ व दादरी प्रकरणी संयुक्त राष्ट्र संघात (यूएन) जाण्याचा इशारा देणारे सपा नेते आझम खान यांनी दिला होता. त्यावेळी अपर्णा यादव यांनी आझम खान यांचे समर्थन केले होते. यूएन एक मोठी संस्था आहे. बीफ व दादरी हे मुद्दे तिथे नेण्यास काहीच हरकत नाही. हे दोन्ही मुद्दे चर्चेचे विषय आहेत. परंतु, आझम यांच्या पत्राने देशाची प्रतिमा डागळणार नसल्याचेही अपर्णा यांनी म्हटले होते.