आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायम म्हणाले; तुमच्या कुटुंबातले कोण मेलेय का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ / कानपूर - उत्तर प्रदेशात सहा दिवसांपासून सुरू असलेला संप ज्युनियर डॉक्टरांनी गुरुवारी अखेर मागे घेतला. कानपूरमधील जिल्हा पोलिस अधीक्षकांची बदली व डॉक्टरांवरील हल्ल्याच्या प्रकरणाचे न्यायालयीन चौकशीचे आश्वासन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा बेमुदत संप मागे घेतला. दरम्यान संपादरम्यान रुग्णांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित करणार्‍या पत्रकारांवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव भडकले. ‘कोण मेले? तुमच्या कुटुंबातील कुणी मेले का?’ असा विचित्र प्रश्न यादव यांनी विचारल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.


दरम्यान, राज्य सरकार आणि डॉक्टरांमध्ये संपावरून सुरू असलेली कोंडी गुरुवारी फुटली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले. याप्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने कानपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यशस्वी यादव यांची बदली करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. सपा आमदार इरफान सोळंकी यांच्याशी झटापट झाल्यानंतर पोलिसांनी 24 डॉक्टरांना अटक केली होती. त्यांची गुरुवारी सुटका करण्यात आली. यावेळी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीची न्यायालयीन आयोगामार्फत चौकशी केली जाणार आहे.