आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muzaffarnagar Riot : No One Die Due To Chill, Uttar Pradesh Secreatary Remark

मुजफ्फरनगर दंगल: थंडीमुळे कुणी मरत नाही, उत्तर प्रदेशच्या सचिवांचे बेताल वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मुजफ्फरनगर दंगलग्रस्तांच्या छावणीतील मुलांच्या मृत्यूबद्दल एकीकडे हळहळ व्यक्त होत असताना उत्तर प्रदेशच्या प्रधान सचिवांनी बेताल वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. थंडीमुळे कुणी मरत नाही, अन्यथा सैबेरियासारख्या अतिथंड प्रदेशात लोक जिवंत राहूच शकले नसते, असे विधान उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव (गृह) ए. के. गुप्ता यांनी केले होते. त्यांच्या या बेताल वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली; परंतु मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र अब हो गया.., असे म्हणून गुप्तांची पाठराखण केली आहे.
मुजफ्फरनगर व शामली येथील छावणीत बारा वर्षांखालील 34 बालके दगावल्याचे उत्तर प्रदेश सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मेरठचे विभागीय आयुक्त मनजितसिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती.
केवळ 4 बालके न्यूमोनियाने दगावली असून उर्वरित विविध आजारांमुळे मृत्यू पावल्याचे समितीने म्हटले आहे. बालकांच्या मृत्यूप्रकरणी कुणावरही ठपका ठेवण्यात आलेला नाही. शुक्रवारी गुप्ता यांच्या वादग्रस्त विधानावर अखिलेश म्हणाले, अब हो गया... सरकारचे यश असो अथवा अपयश; कुणीही दुखावणार नाही हे ध्यानात घेऊन अधिकारी, पक्ष कार्यकर्त्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत.
काय बोलले गुप्ता?
पत्रकार परिषदेत गुप्ता यांना अहवालाबद्दल छेडले असता ते म्हणाले, कुणीही व्यक्ती थंडीमुळे मरत नाही. असे असते तर सैबेरियासारख्या जगातील अतिथंड प्रदेशात एकही व्यक्ती जगला नसता. विषबाधा अथवा न्यूमोनियामुळे मुले दगावली असतील. थंडीमुळे न्यूमोनिया होतो; परंतु थंडीमुळे त्यांचा मृत्यू झालेला नाही. दोन-चार लोक न्यूमोनियामुळे दगावले; परंतु ते थंडीमुळे दगावले नाहीत.
‘त्या’ अधिका-याला छावणीत पाठवा
गुप्ता यांच्या विधानावर विरोधकांनीच नव्हे, तर समाजवादी पार्टीच्या नेत्यांनीही गुप्ता यांना फैलावर घेतले आहे. गुप्ता यांनी आपल्या कुटुंबासह छावणीत एक रात्र घालवून दाखवावी. त्यांना सैबेरियात जाण्याची गरज पडणार नाही, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे नेते कमाल फारुकी यांनी टीका केली, तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यांनीही गुप्ता यांना कमी कपडे घालून छावणीत पाठवा, असा सल्ला दिला आहे. प्रशासन निर्ढावले की, अशा घटना घडत असतात, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले. तर समाजवादी पार्टी आपल्या अपयशाचा कलंक पुसू शकत नाही, असे उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते विजय बहादूर प्रताप म्हणाले.
पिता-पुत्राचे तोंड वेगवेगळ्या दिशेला
मुजफ्फरनगर, शामली येथील दंगलग्रस्तांच्या छावणीवरून समाजवादी पार्टीचे नेताजी मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र मुख्यमंत्री अखिलेश यांचे तोंड वेगवेगळ्या दिशेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या छावण्यांमध्ये एकही दंगलग्रस्त नाही. तुम्ही तपासू शकता. छावण्यांमध्ये केवळ भाजप आणि काँग्रेसचा हा डाव आहे. निवडणूक होईपर्यंत हा मुद्दा उचलून धरण्यासाठीच भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना फूस लावली, असा आरोप मुलायम यांनी केला होता. मात्र, अखिलेश सरकारच्या चौकशी समितीत अहवालात मात्र छावण्यांमध्ये एकूण 4783 निर्वासित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेताजी आणि सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.