आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muzaffarnagar Riots Case: Jailor, Police Helping The BJP MLA

मुजफ्फरनगर दंगलप्रकरण: भाजप आमदारास जेलरचा नमस्कार, पोलिसांचा सॅल्यूट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - मुजफ्फरनगर दंगलीप्रकरणी अटक करण्यात आलेले उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार संगीत सोम यांचे रविवारी तुरुंगात दणदणीत स्वागत झाले. खुद्द तुरुंग निरीक्षकांनी त्यांना नमस्कार केला तर उपस्थित पोलिसांनी कडक सॅल्यूट करीत त्यांना सलामी दिली. दरम्यान, दिल्लीत राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. अखिलेश सरकार बरखास्त करून उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

सरढाणा मतदारसंघाचे आमदार संगीत सोम यांना प्रक्षोभक भाषणे व व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली होती. मुजफ्फरनगर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.रविवारी त्यांना ओराई जिल्हा कारागृहात आणण्यात आले.त्यावेळी तुरुंगातील अधिकारी -कर्मचारी वर्ग त्यांच्या दिमतीला धावून आला.आमदारसाहेब येणार म्हणून सर्वच स्वागतासाठी तुरुंगाच्या मुख्य दरवाजाजवळ उभे होते. सोम येताच तुरुं ग अधिकार्‍याने हात जोडून नमस्कार करीत त्यांचे स्वागत केले. पोलिसांनी कडक सॅल्यूट ठोकला. सोम यांनीही आतील व बाहेरील आपल्या सर्मथकांना हात उंचावून अभिवादन करीत तुरुंगात पाऊल टाकले.


खाप पंचायतीच्या प्रमुखासह 85 जण ताब्यात

दंगलप्रकरणी रविवारी खाप पंचायत प्रमुखासह रविवारी आणखी 85 जणांना ताब्यात घेण्यात आले. फुगना भागाच्या लिसाध गावातील काही गावकर्‍यांनी घरे जाळल्याची तक्रार दंगलीवेळी केली होती. त्याप्रकरणी 85 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये पंचायतीचे प्रमुख बाबा हरकिशन सिंग आणि त्यांचे दोन मुले यांचा समावेश आहे.


निवडून-निवडून धरपकड-बसपाचा आरोप
स्वत:च्या चुका लपवण्यासाठी अखिलेश सरकार एकतर्फी कारवाई करीत असून निवडून-निवडून अटक केली जात आहे, असा आरोप बसपाचे विधिमंडळ पक्ष नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला. भाजप आणि सपा जातीय तेढ निर्माण करीत आहेत. राजकीय सूडापोटी छरथवाल, नूर सलीम यांना अटक करण्यात आली असून काँग्रेस, सपा नेत्यांविरुद्ध कारवाई केली जात नसल्याचे ते म्हणाले.

महानिरीक्षक म्हणतात, अहो ते लोकप्रतिनिधी
पोलिसांच्या स्वागताचे तुरुं ग महानिरीक्षक आर. पी. सिंग यांनी जोरदार सर्मथन केले. सोम हे अद्यापही विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यामुळे किमान आदर सत्काराचा त्यांचा हक्क आहे. यापेक्षा अधिक काही झाले असल्यास मी चौकशी करतो, असे सिंग म्हणाले.


तुरुंगात जोरदार घोषणाबाजी
सोम व दुसरे आमदार सुरेश राणा यांना पोलिस व्हॅनमधून मुजफ्फरनगरहून सोबतच तुरुंगात आणण्यात आले.हे दोघे येणार असल्याने कार्यकर्त्यांनी तुरुंग परिसरात गर्दी केली होती. सोम गाडीतून उतरताच जोरदार घोषणाबाजी झाली. नंतर राणा यांना बांदा तुरुंगात हलवण्यात आले. जिल्ह्यातील काही नेत्यांनीही नंतर सोम यांची तुरुंगात आवर्जुन भेट घेतली.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी रविवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. मुजफ्फरनगर जिल्ह्यातील दंगली नियंत्रणात आणण्यात अखिलेश सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपने तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. सर्वोच्च् न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायाधीशांमार्फत दंगलीची चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपध्यक्ष राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपतींकडे केली. या वेळी भाजपचे खासदार, आमदार उपस्थित होते.