आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडचे मुख्यमंत्री लिझित्सू राहिले शक्तिपरीक्षेला गैरहजर, टी.आर. झेलियांग नवे मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोहिमा- नागा पीपल्स फ्रंटचे नेते व सत्ताधारी डीएएन आघाडीचे अध्यक्ष टी.आर. झेलियांग यांनी बुधवारी नागालँडचे नूतन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजीनाम्याच्या पाच महिन्यांनंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे. एस. लिझित्सू यांना शक्तिपरीक्षेत यश आले नाही. लिझित्सू गैरहजर राहिले. त्यामुळे राज्यपालांनी हा निर्णय घेतला.  

राज्यपाल पी.बी. आचार्य यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. छोटेखानी समारंभानंतर झेलियांग पत्रकारांना म्हणाले, २१ जुलै रोजी संख्याबळ सिद्ध करावे लागणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळातील सदस्य पदाची शपथ घेतील. राज्यपालांनी २२ जुलैची मुदत दिली आहे. ईशान्येकडील महत्त्वाच्या राज्याचे झेलियांग हे  १९ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. बुधवारी सकाळीच राज्यपाल आचार्य यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. एस. लिझित्सू सभागृहात हजर राहिले नाहीत. वास्तविक गुवाहाटी उच्च न्यायालयाने त्यांना संख्याबळ सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने मंगळवारी हे आदेश दिले होते. लिझित्सू यांनी विश्वासदर्शक ठराव घेण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले होते. त्यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्याला लिझित्सू यांनी आव्हान दिले होते. मात्र, गुवाहाटी उच्च न्यायालयाने लिझित्सू यांची याचिका रद्दबातल ठरवली होती.  

स्थानिक स्वराज्य संस्थेतील  निवडणुकीनंतर झाले पायउतार  
नागालँडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिलांच्या ३३ टक्के आरक्षणावरून निवडणुकीत वाद निर्माण झाला होता. त्यातून राज्यभरात झेलियांग यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. ठिकठिकाणी निदर्शने झाली. त्यामुळे झेलियांग यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी राजीनामा दिला होता. त्याच्या पाच महिन्यांनंतर ९ जुलै रोजी राज्यपालांशी संपर्क साधला. आपल्याला ४२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता.  

बंडखोर नेता  
नागालँड पीपल्स फ्रंटचे ६५ वर्षीय झेलियांग हे बंडखोर नेते म्हणून आेळखले जातात. पाच महिने झेलियांग मुख्यमंत्री नव्हते. परंतु लिझित्सू यांचे ते आर्थिक सल्लागार होते. त्यांनी यापूर्वी विविध मंत्रिपदांचीदेखील जबाबदारी सांभाळली आहे. १९७६ मध्ये ते युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणात उतरले. चार दशकांपासून ते नागालँडच्या राजकारणात सक्रिय आहेत. २००३ मध्ये त्यांनी सहा काँग्रेस आमदारांना सोबत घेऊन नागालँड काँग्रेसची स्थापना केली होती. ते २००४ ते २००८ दरम्यान राज्यसभेचे सदस्यही राहिले. २००८ मध्ये ते पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले.
बातम्या आणखी आहेत...