आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्याची चाहूल, भाडेकरू ठेवणे बंद; महाकाल मंदिर परिसरातील घरांमध्ये हॉटेल्स, लॉज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - उज्जैन येथील सिंहस्थ कुंभमेळ्याला आणखी दोन वष्रे अवधी आहे. मात्र, त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. सन 2016 च्या कुंभमेळ्यासाठी साधारण 5 कोटी भाविक येण्याची शक्यता असून त्यासाठी सरकारी यंत्रणेसह सामान्य लोकही पुढे आले आहेत. महाकाल मंदिर परिसरातील 500 मीटर क्षेत्रात अडीचशेहून जास्त घरे हॉटेल्स-लॉजमध्ये रूपांतरित झाली आहेत. या घरांत वर्षानुवष्रे राहत असलेल्या भाडेकरूंना घर सोडण्यास सांगितले आहे. व्यावसायिक गरजेपोटी घरांचे नूतनीकरण केले जात आहे. यामुळे यात्रेकरूंना कमी दरात राहण्याची सोय होत आहे. मेळ्यामुळे शेकडो कुटुंबांना रोजगार मिळाला आणि लाखो रुपयांची कमाई सुरू झाली आहे.
महाकाल भागातील हॉटेल-यात्रेकरू निवास संघटनेचे अध्यक्ष राजेश त्रिवेदी म्हणाले, घरातून हॉटेल-लॉजचा व्यवसाय सुरू केल्यामुळे जवळपास 300 लोकांची कुटुंबे जोडली आहेत. हॉटेल-लॉज सुरू केल्यामुळे येथे यात्रेकरूंना थांबण्यासाठी पुरेशी सुविधा मिळत आहे. त्यातून येथील लोकांची आर्थिक स्थितीही बळकट झाली आहे. शहरातील तीन हजारांहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळतो, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. महाकाल मंदिर क्षेत्रात कुंभमेळा 2016 पर्यंत जवळपास आणखी 300 घरे हॉटेल-लॉजमध्ये रूपांतरित होतील. महाकाल मंदिर, क्षिप्राच्या रामघाटासह अनेक प्रमुख मंदिरांच्या भागात आहे. त्याचबरोबर शहरातील मोठय़ा हॉटेल-लॉजच्या तुलनेत येथे स्वस्तात सोय होत असल्यामुळे महाकाल भागात थांबण्यास यात्रेकरू प्राधान्य देतात.
कहारवाडीच्या घरात पाच वर्षांपासून लॉज सुरू करणारे रमण त्रिवेदी यांनी या व्यवसायातून चांगली कमाई होत असल्यामुळे भाडेकरूंना काढून टाकल्याचे सांगितले. महाकाल मंदिरासमोर लॉज चालवणारे दीपक जोशी म्हणाले, आम्ही यात्रेकरूंना कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा देत आहोत. सुरेश योगी, नागपालसह या भागातील अनेक हॉटेल-लॉज संचालकांची कथा अशीच आहे. स्थानिक लोक या व्यवसायातून रोजगारही निर्माण करत आहेत. घरबसल्या व्यवसायामुळे आमचे नशीबच फळफळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.