आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namo Tea Bring Freshness Within BJP Activist In Bihar

बिहारमध्ये ‘नमो चाय’मुळे भाजपच्या प्रचाराला तरतरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - सर्वसाधारणपणे बिहारच्या राजधानीमध्ये सकाळी सकाळी फुटपाथवर लागलेल्या चहाच्या टपरीवर लोक देशाच्या राजकारणाची चर्चा करतात. ही बाब नेमकी हेरत भाजपने तेथूनच ‘नमो चाय’च्या माध्यमातून निवडणूक प्रचाराची सुरुवात अनोख्या पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे घोषित उमेदवार नरेंद्र मोदी (नमो) सध्या अनेक रॅलींमधून ते स्वत: कधी काळी चहा विक्री करत असल्याचा उल्लेख आवर्जून करतात. पाटणा येथे 27 ऑक्टोबर रोजी मोदींची बिहारमध्ये पहिली रॅली होणार आहे.


पाटण्याच्या गांधी मैदानावर होणा-या या रॅलीची भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. या रॅलीला ‘हुंकार रॅली’ असे नाव देण्यात आले असून त्याचा प्रचार भाजपने चहाच्या टप-यांपासून सुरू केला आहे. या रॅलीमुळे बिहारमध्ये भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. पाटणा येथे फुटपाथवरील 30 पेक्षा जास्त दुकानांवर एक बॅनर लावण्यात आले आहे. त्याच्या एका कोप-यात मोदींचे छायाचित्र असून दुस-या कोप-यात चहाच्या टपरीमालकाचा फोटो व मध्ये ‘नमो चाय’ असा उल्लेखही आहे.


या फोटोबाबत दुकानदारांना छेडले असता सुरुवातीला स्पष्टपणे काही सांगण्यास ते नकार देतात. मोदींच्या बाजूने किंवा विरोधात बोललो तर ग्राहक नाराज होतील, अशी भीती त्यांना सतावते. परंतु काही दुकानदार स्पष्ट बोलतात. ‘मोदींचे पोस्टर लावणे चुकीचे आहे काय?’ असा त्यांचा सवाल असतो. भाजपने ‘नमो चाय’च्या माध्यमातून प्रचाराचा अनोखा फंडा शोधला आहे. तो कितपत प्रभावी ठरला याचे उत्तर 27 तारखेच्या रॅलीच्या गर्दीतून मिळेल.


मोदी पीएम व्हावेत हीच इच्छा
काही दुकानदार मात्र मोदींसोबत पोस्टरवर स्वत:चा फोटो पाहून मनोमन खुश आहेत.. मोदींना समर्थन देण्यासही त्यांची हरकत नाही. दरियापूरमध्ये ‘नमो’चे बॅनर लावून चहा विकणा-या राहुल कुमारला बॅनरबद्दल विचारले असता तो म्हणाला, मत कुणाला देणार हे आताच सांगू शकणार नाही, परंतु मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा तो बोलून दाखवतो.


रॅलीच्या निमंत्रणाचा फंडाही अनोखा
भाजपने या रॅलीसाठी लोकांना निमंत्रण देण्यासाठी अनोखा फंडा शोधला आहे. एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही काय? जर याचे उत्तर होय असेल तर पाटणा येथे होणा-या हुंकार रॅलीसाठी अवश्य उपस्थित राहा. पाटण्याच्या बांकीपूरचे आमदार नितीन नवीन म्हणाले की, दिल्लीच्या रॅलीमध्ये मोदींनी त्यांच्या चहा विकण्याची गोष्ट सांगितली होती. त्या गोष्टीच्या आधारे भाजप मोदींना चहा विक्रेत्यांशी जोडू इच्छितो. चहाच्या दुकानांवर मोदींचे पोस्टर लावण्याचे श्रेय दुकानदारांचेच आहे. चहा विकणारा देशाचा पंतप्रधान व्हावा, ही त्यांचीही इच्छा आहे.


राष्‍ट्रपतींच्या दौ-याचा फटका?
पाटण्यात 27 ऑक्टोबर रोजी होणा-या नरेंद्र मोदींच्या रॅलीला राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जींच्या दौ-याचा फटका बसू शकतो. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रणव मुखर्जी यांना 26 व 27 ऑक्टोबर रोजी बिहारला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांचा दौरा निश्चित झाला तर त्याचा फटका मोदींच्या रॅलीला बसू शकतो. सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांची कोंडी करून त्यांना रॅलीला जाण्यापासून रोखले जाऊ शकते. कारण मोदींची रॅली होणार असलेल्या गांधी मैदानापासून जवळच श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये राष्‍ट्रपतींचा कार्यक्रम होणार आहे. भाजपने यासाठी नितीशकुमार सरकारवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.