आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण हृदयालयाची स्पंदने आयआयएम विद्यार्थ्यांच्या हाती, विद्यार्थ्यांचा समाजकार्याकडे वाढता कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - एखादे मोठे व्यवस्थापन नव्या पिढीच्या हाती सोपवण्यात खूप मोठी जोखीम असते. मात्र देशातील सर्वात मोठे आणि कमी शुल्कात सेवा देणारे नारायण हृदयालय हे आता आयआयएम पदवीधरांच्या हाती देण्यात आले आहे. नुकतेच आयआयएमच्या 7 विद्यार्थ्यांनी रुग्णालयाची निवड केली आहे. कामासोबत समाधान मिळवण्यासाठी एकूण 15 विद्यार्थी या व्यवस्थापनात समाविष्ट झाले आहेत.
30 वर्षांचा अक्षय ओलेटी चार वर्षांपूर्वी हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये अगदी नवखा होता. पण आज सामाजिक कटिबद्धतेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या नारायण हॉस्पिटलच्या (एनएच) उच्च व्यवस्थापन टीमचा तो एक भाग आहे. अक्षयसह आयआयएम 2010 च्या बॅचमधील इतर चार जण या रुग्णालयात रुजू झाले आहेत. एनएच समूहात उपाध्यक्ष असलेल्या अक्षयवर देशातील 27 शहरांत विस्तारलेल्या रुग्णालयांसाठी वर्षाला 300 कोटी रुपयांची खरेदी करण्याची जबाबदारी आहे. 250 सहकार्‍यांच्या मदतीने तो ही जबाबदारी पार पाडतो. तो सांगतो, ‘निम्म्याहून अधिक विद्यार्थी कॅम्पसमध्ये मिळालेली नोकरी वर्षाच्या आतच बदलतात. मात्र आम्ही पाच जण चार वर्षांपासून येथेच आहोत आणि कुठेही जाणार नाहीत.’
अक्षयच्याच बॅचमधील मनू रामचंद्रन याच्यावर भारताबाहेरील एनएचचे पहिले सर्वात मोठे रुग्णालय स्थापन करण्याची जबाबदारी सोपवली होती. केमेन बेटावर फक्त दीड वर्षात उभे ठाकलेले हे रुग्णालय 25 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
एनएचचे 60 वर्षीय संस्थापक डॉ. देवी शेट्टी म्हणतात, ‘मी आजही दररोज 70 रुग्ण तपासतो. तीन शस्त्रक्रिया करतो. अखेरच्या श्वासापर्यंत हेच करण्याची इच्छा आहे. व्यवस्थापनात माझे मन रमत नाही. आतापर्यंत डॉ. रघुवंशी हे काम पाहत होते. मात्र आता मला हे संपूर्ण व्यवस्थापन व्यावसायिक लोकांवर सोपवायचे आहे. आमचे रुग्णालय आयआयएम पदवीधरच सांभाळतील. विदेशातील पहिल्या रुग्णालयाच्या प्रमुखपदी मनू रामचंद्रनची नियुक्ती करून या मोहिमेची सुरुवात झाली आहे. ’
आयआयएममधून बाहेर पडलेल्या 15 तरुणांची सुसज्ज टीम एनएचकडे आहे. याच टीमच्या कर्तृत्वामुळे चार वर्षांत सर्वात मोठय़ा दोन रुग्णालयांची संख्या 14 वर गेली. आता जिल्हा स्तरावरही हे रुग्णालय स्थापन केले जाईल. याच विद्यार्थ्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून महागडे उपचार सामान्य रुग्णांना परवडतील एवढय़ा दरात उपलब्ध करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे देश-विदेशातील प्रसिद्ध कंपन्यांमध्ये भरगच्च पॅकेजवर जाणार्‍या विद्यार्थ्यांचे विचारही झपाट्याने बदलत आहेत. 2014 च्या बॅचमधील मुंबईचा अजिंक्य देशमुख सांगतो की, ‘पाच-सहा वर्षे कॉर्पोरेट जगात राहिल्यानंतर अनेक सीनियर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजात पोहोचून लोकांसाठी काही करण्याची इच्छा आहे.’ गरजू विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेणार्‍या एसीई क्रिएटिव्ह नावाच्या एका संस्थेतून अजिंक्यच्या करिअरची सुरुवात झाली आहे. या वर्षी आयआयएम बंगळुरूच्या 65 विद्यार्थ्यांनी अक्षयपात्र या मध्यान्ह भोजनात सक्रिय असलेल्या संस्थेकडे अर्ज दिले होते. यात शेवटपर्यंंत कुणीही रुजू झाले नाही. मात्र प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अर्ज देण्याची ही पहिलीच वेळ होती.
कसे शक्य झाले?
0 2001 मध्ये स्थापन झालेल्या नारायण रुग्णालयात 90 हजार ते एक लाख रुपयांतच हार्ट सर्जरी केली जाते.
0पैशांच्या अडचणीमुळे कुणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, हा नियम आहे.
0हायटेक ऑपरेशन रूम 14 तास काम करतात. दररोज 32 सर्जरी. यात पाच विदेशी रुग्णांचा समावेश आहे.
आयआयएम विद्यार्थ्यांचे विचार बदलण्यामागील कारणे
नोकरीपेक्षा शेट्टी यांचा उपक्रम महत्त्वाचा
प्रशांत येतुकुरी, वय 27, गुंटूर, आंध्र प्रदेश. कॉम्प्युटर इंजिनिअर. अमेरिकन कंपनीत वर्षाला 40 लाख रुपये पगाराची नोकरी सोडून आयआयएममध्ये प्रवेश घेतला. व्यवस्थापन कौशल्याने खर्च निम्मा कमी होऊ शकतो, यावर डॉ. देवी यांचे मत ऐकले. तेव्हापासून आपल्यातील उत्तमोत्तम याच ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला.
नारायण हृदयालयाची स्पंदने आयआयएम विद्यार्थ्यांच्या हाती
हेल्थकेअरमध्ये विकासाची संधी जास्त
अर्पितकुमार, वय 26 वर्षे. बडोदा, गुजरात. इलेक्ट्रिक इंजिनिअर. तीन वर्षे सरकारी नोकरी केली. आईवडील आरोग्य विभागात असल्यामुळे येथे आले. आरोग्य क्षेत्रात विकासाची संधी जास्त असल्यामुळे त्याने नारायण हॉस्पिटलचे बिझनेस मॉडेल निवडले.
अर्थपूर्ण काम करण्याची संधी इथेच दिसली
प्रियंका सिंह, वय 24 वर्षे. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश. मुलांच्या एका एनजीओशी संलग्न होती. तिला करिअरसाठी सोशल बिझनेस मॉडेलच हवे होते. आरोग्य क्षेत्र जास्त अनुकूल वाटले. ती म्हणते, कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आलेल्या सर्व कंपन्यांमध्ये अर्थपूर्ण काम करण्याची संधी यातच होती.
जगातील सर्वात स्वस्त हार्ट सर्जरी
0 पायाभूत सुविधांचा अधिक वापर. सरकारी वेळ 5 ते 8 तास. एनएचमध्ये 14 तास.
0आठवड्यातून सहा दिवस सलग काम
040 हून अधिक दक्ष हार्ट सर्जन व कुशल व्यवस्थापकांचे टीमवर्क