आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Rane Called To Goa Chief Minister, Appeal To Release Son

पुत्रप्रेमापोटी राणेंचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन, लवकर सुटका करण्‍याची विनंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोवा-महाराष्ट्र सीमेवरील टोलनाक्यावर राडा करणारा आपला पुत्र नितेश याची सुटका करण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना फोन केला. नितेशची लवकरात लवकर सुटका करण्याची त्यांनी पर्रिकरांना विनंती केली. दरम्यान, नितेश राणे यांच्यासह चार जणांची जामिनावर सुटका झाली आहे. नितेशच्या अटकेचे पडसाद बुधवारी मुंबईत उमटले. बोरिवलीत गोव्याला जाणा-या बसेसची स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
राणेंनी स्वत: मला फोन केला. नितेशप्रकरणात जातीने लक्ष घाला, शक्य असेल तर त्याची सुटकाही करा, अशी विनंती राणेंनी केली. परंतु आपण न्यायालयात जावे असा सल्ला मी राणेंना दिला अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी दिली. अर्थात न्यायालयात जा असा सल्ला दिल्यानंतर राणेंनी आपला सल्ला सकारात्मक पद्धतीनेच घेतला. त्यांची विनंती नाकारली म्हणून रागावले नाहीत अथवा उद्धटपणे प्रतिक्रियाही दिली नाही, असेही पर्रिकरांनी स्पष्ट केले.
अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती : टोल भरण्यासाठी नितेश यांच्याकडे पाचशे रुपये नव्हते असे नव्हे. पाचशे रुपये नितेशसाठी किरकोळ रक्कम आहे. पण आपल्या अधिकार गाजवण्याच्या वृत्तीतून ही मारहाणीची घटना घडली, असे पर्रिकर म्हणाले.
रात्री उशिरा जामीन : टोलनाक्यावरील मारहाणीप्रकरणी नितेश आणि अन्य तिघांची मंगळवारी रात्री उशिरा जामिनावर सुटका झाली. मापुसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर नितेश राणेंसह 9 जणांना हजर करण्यात आले होते. उर्वरित पाच जणांना पोलिस कोठडी देण्यात आली. नितेश यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गोव्याकडे निघालेल्या चार पर्यटक गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.