आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनधन खात्यांत जमा काळा पैसा गरिबांनाच देण्याचा विचार - मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरादाबाद -नोटबंदीनंतर जनधन खात्यांत जमा झालेला काळा पैसा गरिबांच्याच हक्काचा होऊ शकतो. पण कसा? त्याची युक्ती सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी शोधत आहेत. भ्रष्टाचारी लोक तुरुंगात जावेत आणि हा पैसा गरिबांच्या घरातच राहावा, यासाठी मी डोके लावत आहे, असे मोदी यांनी येथे एका सभेत बोलताना सांगितले.

भाजपच्या परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलताना मोदी म्हणाले, जनधनवाल्यांनी आपल्या खात्यांतून पैसे काढू नये. कुणालाही घाबरू नये. पैसे देणाराने जर दबाव आणला, जास्त दादागिरी केली तर मोदींना पत्र लिहीन म्हणून सांगा. नोटबंदीनंतर श्रीमंत रांगा लावून गरिबांच्या घरी जात आहेत. लोकांच्या बिछान्याखालचा पैसा उगीच निघत नाही. पै-पैवर सव्वाशे कोटी देशवासीयांचा हक्क आहे. जे काम ७० वर्षांत झाले नाही, ते करायला थोडा त्रास होईल. गरिबांच्या नावावर बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, पण त्यांना बँकेत जाण्याची संधीच दिली नाही. मी जन धन खाती उघडण्याची घोषणा केली तेव्हा लोक खिल्ली उडवत होते. अडचणी येऊनही शेतकऱ्यांनी पेरण्या कमी होऊ दिल्या नाहीत. जे लोक भ्रमात आहेत, ते नैराश्य पसरवत आहेत, असेही मोदी म्हणाले.
बँकेसमोर लागलेल्या रांगांवर
देशाला ७० वर्षे रॉकेल, गहू व साखरेसाठी रांगेत उभे करण्यात आले आहे. या सर्व रांगा संपवण्यासाठी मी आता शेवटच्या रांगा लावल्या आहेत. लोकांचे कठोर परिश्रम, त्याग आणि संघर्ष वाया जाणार नाही. बेइमानीचे सर्व रस्ते बंद करण्यासाठी मला लोकांची मदत हवी आहे.
डिजिटलमधील अडचणीवर
६५ टक्के देश तरुण आहे. मोबाइलद्वारे खरेदी वाढवण्यासाठी त्यांनी सहकार्य द्यावे. त्यामुळे इमानदारीचे मार्ग उघडतील. देशात निरक्षरांची संख्या जास्त आहे, असे काही लोक म्हणतात. मात्र अमेरिकेत अाजही ठसा मारून मतदान करतात आणि भारतातील लोक बटण दाबून मतदान देतात, हे कदाचित त्यांना माहीत नसावे. येथील
लोक बदल वेगाने स्वीकारतात.
नोटबंदीच्या विरोधावर
लोक माझ्यावर आरोप करत आहेत, त्यामुळे मी हैराण आहे. देशाला लुटणाऱ्यांकडून हिशेब घेणे चुकीचे आहे का? दंडुका घेऊनच भ्रष्टाचार काढावा लागेल. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा गुन्हेगार आहे का? मी भ्रष्टाचारावर आघात केला हाच माझा गुन्हा का? देशातील लोकच माझे हायकमांड आहेत, दुसरा कुणीच नाही .
कॅशलेस अर्थव्यवस्थेवर
आधीच्या सरकारांनी नोटा छापून छापून सरकार चालवले. मी नोटा छापून बेइमानांना संधी देऊ इच्छित नाही. देश २१ व्या शतकात आहे. डिजिटल इंडिया बनण्यास तयार आहे. देशात ४० कोटी स्मार्टफोन आहेत. कमीत कमी ४० कोटी लोकांनी तरी नोटांच्या भानगडीतून बाहेर पडावे. भ्रष्टाचार नाहीसा होईल.
विराेधक माझे काय करून घेतील? मी फकीर आहे, झोला घेऊन निघून जाईन
मोदी म्हणाले, विरोधक माझे काय करतील? मी फकीर आहे. झोला घेऊन जाईन. या फकिरीनेच मला गरिबांसाठी लढण्याची शक्ती दिली आहे. जर हेतू स्वच्छ असेल तर देश काहीही सोसायला तयार होतो. सव्वाशे कोटी लोकांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
नोटबंदीपूर्वी काही आठवडे बँकेतील जमा अचानक कशी वाढली : काँग्रेस
हैदराबाद। नोटबंदीच्या काही आठवडे आधी ‘आर्थिक व्यवहार’ कसे वाढले? बँकेत मोठी जमा झाली ती खाती कुणाची? मोदी काही लोकांनाच माहिती देत होते का? याची सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती वा जेपीसी मार्फत चौकशी करा, असे काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले
पुढील स्लाइडमध्ये पाहा मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...