वाराणसी - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वाराणसी दौ-याच्या दुस-या व शेवटच्या दिवशी अस्सी घाटावर स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. हातात फावडे घेऊन घाण बाजूला काढली. त्यानंतर राज्यातील नऊ विशेष व्यक्तींना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचाही समावेश आहे.
पंतप्रधानांच्या वेळापत्रकात अस्सी घाटावरील कार्यक्रमाचा समावेश नव्हता. परंतु मोदी यांनी अचानक घाटावर जाण्याचे ठरवले. याविषयी नगरपालिकेच्या कर्मचा-यांना साधी कल्पनाही आली नव्हती. त्यानंतर मात्र घाट परिसरात तातडीने स्वच्छता करण्यात आली. शनिवारी मोदी यांनी फावडे हाती घेऊन पुढाकार घेतला. घाटाच्या सफाईचे काम सुरू केले आहे. एक महिन्यात घाट स्वच्छ केला जाईल, असे आश्वासन मला येथील स्वयंसेवी संस्थांकडून मिळाले आहे, असे मोदी या वेळी म्हणाले.
मोहिमेत मनोज तिवारी, सुरेश रैना, कैलास खेर
राज्यातील स्वच्छता मोहिमेला पुढे नेण्यासाठी मोदी यांनी राज्यातील नऊ प्रसिद्ध व्यक्तींकडे मोहिमेची जबाबदारी सोपवत असल्याचे सांगितले. अखिलेश यादव, चित्रकूट विद्यापीठाचे कुलगुरू राम भद्राचार्य, खासदार मनोज तिवारी, साहित्यिक मनु शर्मा, क्रिकेटपटू सुरेश रैना, मोहंमद कैफ, पद्मश्री देवी प्रसाद द्विवेदी, विनोदवीर राजू श्रीवास्तव, गायक कैलास खेर यांना आवाहन केले.
रेल्वे गेस्ट हाऊसमध्ये बालपणाची आठवण
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच
आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आले होते. दोन िदवसांच्या काळात त्यांनी रेल्वेच्या विश्रामगृहात राहणे पसंत केले. येथील भेट पुस्तिकेत त्यांनी आपली आठवण सांगितली. बालपणातील मोठा काळ रेल्वेस्थानक आणि रेल्वेच्या डब्यात गेला आहे. येथे राहताना संपूर्ण बालपण आठवले.