आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi Makes Youth Connect With Obama's 'Yes, We Can'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या ‘मिशन 2014’चा दक्षिणेत श्रीगणेशा; मोदींनी दिला ‘यस वुई कॅन’चा मंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी हैदराबादेतून भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचार मोहिमेचा रविवारी श्रीगणेशा केला. कुठेही कट्टरवादी भूमिका दिसू नये ही दक्षता बाळगून मोदींनी काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवला. काँग्रेसला आंध्र प्रदेशने सर्वाधिक खासदार दिले आहेत. म्हणून मोदींचे लक्ष्य हा पक्ष आणि यूपीए सरकारच होते. दोघांच्याही अपयशाचा पाढा वाचून त्यांनी बदल घडवून आणण्याचा संकल्प उपस्थितांना करायला लावला. तेलुगूमधून भाषणाचा प्रारंभ करून मोदींनी आपली गुजराती छबी पुसण्याचा प्रयत्न केला, शिवाय एरव्ही भाषणात गुजरातचे उदाहरण देणार्‍या या नेत्याने या वेळी छत्तीसगड आणि तामिळनाडूचा उल्लेख केला. किश्तवाडमधील जातीय दंगल देशविरोधी कट असल्याचे ते म्हणाले.

5 रुपये तिकीट : या जाहीर सभेसाठी भाजपने चक्क 5 रुपये तिकीट ठेवले होते. उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी हा निधी दिला जाणार आहे. तिकीट असूनही सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहून मोदींनाही हुरूप आला. हजारोंच्या संख्येने उपस्थित आबालवृद्धांना त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या स्टाइलमध्ये ‘यस वुई कॅन’ आणि ‘यस वुई विल डू’ अशी घोषणा द्यायला लावली. उपस्थितांनीही तेवढय़ाच उत्साहाने मोदींना प्रतिसाद दिला.

अडवाणी, शिवराज, रमण यांची स्तुती
सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे संकेत देत मोदींनी भाषणात लालकृष्ण अडवाणी, शिवराजसिंह चौहान आणि रमणसिंह यांचा आदराने उल्लेख केला. काळ्या पैशावर अडवाणींनी केलेल्या देशव्यापी दौर्‍याचा संदर्भ देत त्यांनी केंद्रावर टीका केली. मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील योजनांचे कौतुक केले.

गुजरातचा विकास नरेंद्र मोदींमुळे नाही : चव्हाण
गुजरातच्या विकासाचा गवगवा मोदी करत आहेत, परंतु त्यात त्यांचे योगदान नाही. गुजरातचा विकास तेथील नागरिकांनी केला आहे, अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत केली.

मोदींच्या निवडणूक गाडीचे 5 गिअर
पहिला गिअर - युवाशक्तीबद्दल चिंता
मोदी युवकांना म्हणाले, तुम्हाला देशाची चिंता सतावत आहे. परंतु मला माझ्या देशातील तरुणांची चिंता आहे. मनात प्रश्न पडतो की रोजी-रोटीसाठी युवा पिढी कुठे जाणार? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या काँग्रेसशासित राज्यांत सर्वाधिक आत्महत्या होतात. आंध्रातील तरुण पोट भरण्यासाठी आखाती देशांत जातात.

दुसरा गिअर - नेतृत्वाची वैशिष्ट्ये सांगितली
काँग्रेसचे धोरण फोडा व राज्य करा असे आहे. याउलट अटलजींनी छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंडची निर्मिती केली तेव्हा या राज्यांसोबतच मध्य प्रदेश, यूपी व बिहारचे लोकही मिठाई वाटत होते. काँग्रेसने तेलंगणाच्या मुद्दय़ावर भावाभावात दरी निर्माण केली.

तिसरा गिअर - भावी सरकारचे स्वप्न
सरकारचा एकच धर्म असतो, इंडिया फस्र्ट. एकच धर्मग्रंथ असतो, भारताची घटना. एकच भक्ती असते, भारतभक्ती. एकच शक्ती असते, कोटी कोटी जनशक्ती. एकच पूजा असते, सव्वाशे कोटी लोकांचे हित. एकच कार्यशैली, सर्वांची सोबत सर्वांचा विकास.

चौथा गिअर - काँग्रेसेतर पक्षांवर लक्ष केंद्रित
मोदींनी आंध्रचे लोकप्रिय नेता एन.टी. रामाराव यांची आठवण काढली. एनटीआरच्या मदतीने राज्यात सर्वप्रथम काँग्रेसेतर सरकार आले होते. आपण काँग्रेसमुक्त देश निर्माण करून त्यांना खरी र्शद्धांजली अर्पण करू शकतो. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने एनटीआर यांचे स्वप्न पूर्ण करावे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या सुशासनाचा उल्लेख करत त्या संभाव्य सहकारी असल्याचे संकेत दिले.

परराष्ट्र धोरणाचा टॉप गिअर
- घुसखोर चीनला फटकारण्याऐवजी परराष्ट्रमंत्री तिथे जाऊन बीजिंग शहराची स्तुती करतात. शिर कापणार्‍या पाकिस्तानी पाहुण्यांना प्रोटोकॉलच्या नावावर बिर्याणी खाऊ घातली जाते. अशा सरकारने व देश चालवणार्‍यांनी बुडून मरावे.
- तेव्हा पंतप्रधान म्हणाले होते, आम्ही त्याचा हिशेब चुकता करू. आता पाकने पाच सैनिकांची हत्या केली. तरीही डॉ. सिंग गप्प आहेत.
- सर्वोच्च् न्यायालय नसते तर इटलीचे खुनी सैनिक भारतात परत आलेच नसते.