आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Political Rally In Bihar, BJP, Divya Marathi

लोकसभा निवडणूक: काँग्रेसच्या भल्यासाठी तिसरा मोर्चा, नरेंद्र मोदी यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरपूर - कॉँग्रेसचे हित साधण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली असून देशासाठी ही आघाडी चांगली ठरणार नाही, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला. मोदी यांनी या वेळी बिहारचे मुख्यमंत्री व भाजप आघाडीचे मुख्य विरोधक नितीश कुमार यांच्यावरही टीका केली.


मोदी म्हणाले, तुम्ही सहा महिन्यांपूर्वी किंवा वर्षापूर्वी तिस-या आघाडीचे नाव ऐकले होते काय? निवडणुकीच्या तोंडावर ती स्थापन झाली आहे. त्यांच्यामुळे निवडणुकीचा विचका होऊ शकतो, देशाचे काहीही भले होणार नाही.
कॉँग्रेस आणि अन्य पक्षांवर हल्ला चढवत भाजप म्हणजे सर्व जाती समाजाला विकास प्रक्रियेत सामावून घेणारा पक्ष होय. अन्य कोत्या मनाचे पक्ष मोदी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. बिहारच्या विकासाचा दावा फोल ठरवत त्यांनी त्या राज्यात केवळ 23 टक्के घरांमध्ये शौचालय, तर 16 टक्के घरांना वीज असल्याची माहिती दिली. रालोआमध्ये नव्याने सहभागी झालेले लोजपाचे नेते रामविलास पासवान आणि राष्‍ट्रीय लोकसमता पार्टीचे उपेंद्र कुशवाह यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.


धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मूर्ख बनवले जातेय : नकारात्मक राजकारण आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरणार नाहीत, असा हल्ला मोदी यांनी केला. त्यांनी 27 आॅक्टोबरच्या पाटणा येथील सभेचा संदर्भ दिला. सभेदरम्यान झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता. मोदी यांनी या मुद्द्यावरून नितीश कुमार मतपेटीचे राजकारण करत असल्याची टीका केली. जे लोक मतपेटीच्या राजकारणात गुंतले आहेत, ते मला स्फोटातून संपवू इच्छित होते, असा आरोप त्यांनी केला.


बिहार दहशतवाद्यांचे आश्रयस्थान
मतपेटीच्या राजकारणामुळेच शेजारी नेपाळमधील दहशतवाद्यांचे बिहार आश्रयस्थान बनले आहे. याच राजकारणातून तिसरी आघाडी स्थापन करणा-या नेत्यांचाही त्यांनी समाचार घेतला. सुरुवातीच्या काळात कोणत्याही घटनेमागे सीमापार दहशतवादी कारवायांचा हात आहे, असे सांगण्याची फॅशन होती. सध्या मात्र धर्मनिरपेक्षतेचा वापर जडीबुटीसारखा केला जात आहे. मात्र, सध्या महागाई आणि भ्रष्टाचार हा मुख्य मुद्दा आहे.


कोणत्याही मुद्द्यावर धर्मनिरपेक्षतेचे उत्तर
तुम्ही जेव्हा महागाई वाढली आहे असे म्हणता त्यावेळी ते धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे, असे सांगतात. भ्रष्टाचार वाढला आहे, असे सांगितल्यावरही विरोधकांचे उत्तर धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे, हेच उत्तर आहे. रालोआमुळे विरोधकांच्या नैराश्यात आणखी भर पडेल, असे मोदी म्हणाले. त्यांनी आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात मैथिली, मखना या स्थानिक भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांचा हा तिसरा बिहार दौरा होता.


मोदी विकास पुरुष : चिराग पासवान
रामविलास पासवान यांचे पुत्र व लोजपाच्या संसदीय मंडळाचे प्रमुख चिराग पासवान यांचीही सभेला उपस्थिती होती. नरेंद्र मोदी विकास पुरुष असून त्यांच्याकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत. ते देशाचे भावी पंतप्रधान आहेत, असे चिराग यांनी आपल्या भाषणात सांगितले.

‘गुजरात राज्य एफडीआयसाठी सर्वोत्कृष्ट नाही ’
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे मार्केटिंग केलेले प्रॉडक्ट असल्याची टीका केंदीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी केली. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक होत असल्याचे मोदी सांगत आहेत. मात्र, त्यांच्या 13 वर्षांच्या सत्ताकाळात केवळ 8 अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक झाल्याचा दावा शर्मा यांनी केला. 1.38 लाख कोटी रुपयांच्या कर्जासह गुजरात देशातील तिसरे कर्जदार राज्य आहे.
परकीय गुंतवणुकीत या राज्याचा सहावा क्रमांक आहे.