आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात मोदी ‘रथयात्रा’; अमरेली रक्ताने रेखाटले मोदींचे चित्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या सर्व 403 विधानसभा मतदारसंघात 11 मार्चपासून नरेंद्र मोदी यांच्या सर्मथनार्थ रथयात्रा काढण्यात येणार आहे. भाजपने आजपर्यंत ज्या मैनपुरी, इटावासह आठ लोकसभा मतदारसंघात विजय प्राप्त केला नाही, त्यास भाजपने ‘डार्क झोन’ ठरवले आहे. या क्षेत्रात जवळपास 19 हजार गावे असून ती पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येतात. राज्यातील हे अंधकारमय कोपरे नरेंद्र मोदी रथ उजळवणार आहे.

मोदी रथाला निवडणूक आयोगाची अद्याप परवानगी मिळाली नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत बाजपेयी म्हणाले, आयोगाच्या मंजुरीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. सर्व दस्तऐवज सोमवारी निवडणूक आयोगाकडे पाठवले जातील. एक एक रथ दररोज 11 गावांमध्ये पाठवला जाईल. देखरेखीसाठी रथांना जीपीएसद्वारे जोडले जाईल. पश्चिम उत्तर प्रदेश वगळता बुंदेलखंड, बुज, अवध क्षेत्र, वाराणसी व गोरक्ष क्षेत्रासोबत रुहेलखंड भाग डार्क झोनमध्ये आहे.

मोदी रथ हे करणार
0 छोट्या छोट्या वाहनांना रथाचा आकार दिला जाईल. त्यात एलसीडी स्क्रीन असेल. डार्क झोनमधील गावांमध्ये एलसीडीवर 10 मिनिटे मोदींचे भाषण दाखवले जाईल.
0प्रत्येक रथावर दहा-दहा लोकांची टीम असेल. त्यांना दोन भागांत काम करावे लागेल.
0 पक्षाचे प्रचार साहित्य घरोघरी वाटण्यात येईल.
0 प्रत्येक गावातून 20-25 लोकांची नावे, पत्ते आणि मोबाइल क्रमांकासह घेऊन यावी लागतील.
0 रथ एकाच गावात दिवसभर उभा राहील. त्यासाठी तो जीपीएसने जोडला जाईल.
0 एका दिवसात चारशे अहवाल मागवून त्याची छाननी केली जाईल. प्रदेश कार्यालय अहवाल मागवेल. यानंतर दुसर्‍या दिवशीची रणनीती पाठवली जाईल.

रक्ताने रेखाटले मोदींचे चित्र
अमरेली- गुजरातमधील कुंकावाव गावातील मयूर डाभी या तरुणाने आपल्या रक्ताने नरेंद्र मोदी यांचे विशाल स्केच रेखाटले. मोदींच्या विचाराने प्रभावित झालो आहे. मात्र कोणत्याही पक्षाचे मी सर्मथन करत नाही, असे मयूरने सांगितले. त्याने 6 बाय 3 फुटांचे स्केच तयार केले. यासाठी त्याने गुरू पी.बी. भट्ट यांची मदत घेतली. रक्त गोठू नये म्हणून रसायनाचा वापर करण्यात आला. मोदींना हे चित्र दाखवण्याची त्याची इच्छा आहे. (छाया : कौशिकगिरी गोस्वामी)

मायावती यांच्या उत्तर प्रदेशातील सर्व 80 मतदारसंघात सभा
बसपा अध्यक्ष मायावती यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यातील सर्व 80 लोकसभा मतदारसंघात त्या सभा घेणार आहेत. यानंतर त्या अन्य राज्यात प्रचार करतील. 25 मार्चपासून त्यांच्या प्रचारसभांना सुरुवात होईल. त्याआधी मायावती पक्षाच्या बैठकीत उमेदवारांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. काही मतदारसंघातील उमेदवार बदलले जातील.

युपीत नक्षल्यांकडून घातपाताची शक्यता
लोकसभा निवडणुकीमध्ये नक्षलवादी हिंसाचार करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकार या संदर्भात शेजारी राज्यांशी चर्चा करणार आहे.11 मार्च रोजी मध्य प्रदेशसोबत तर होळीनंतर(दि.16) बिहार, झारखंड व छत्तीसगड पोलिसांसोबत बैठक होईल. केंद्राकडून मानवरहीत विमान, हेलिकॉप्टर आणि सॅटेलाइट फोन मागवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मिर्झापूर, सोनभद्र व चंदौली आधीपासूनच नक्षलग्रस्त जिल्ह्यात येत आहे. बलियालाही नक्षलग्रस्त घोषित करावे, अशी राज्य सरकारची अनेक दिवसांपासून मागणी आहे.