आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हल्ल्याच्या धमकीनंतरही सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींची आज मथुरेत सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा - केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त मथुरेत नगला चंद्रभानमध्ये सोमवार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हे गाव पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मभूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या वेळी भाषण होणार असून त्यांच्या हस्ते जनकल्याण योजनेचा शुभारंभ होईल.

पंतप्रधानांवर हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. हवाई दलाचे हेलिकॉप्टर आकाशातून देखरेख करत आहेत. फरकनजीक १० किमी परिसर नो फ्लाइंग झोन करण्यात आला आहे. येथील आकाशात पंतप्रधान, राज्यपाल अाणि मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरशिवाय कोणत्याही विमानोड्डाणाला परवानगी देण्यात आलेली नाही. हवाई दलाने मोबाइल रडार यंत्रणाही स्थापन केली आहे.

उत्तर प्रदेशच्या कायदा-सुव्यवस्था विभागाचे पोलिस महानिरीक्षक सतीश गणेश यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण कार्यक्रमावर आयबी आणि यूपीच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. सुरक्षा व्यवस्थेत सात पोलिस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, १९ डीएसपी, पीएसीच्या आठ आणि आरएएफच्या पाच तुकड्या तैनात आहेत. याबरोबरच पीएसीची अतिरिक्त तुकडीही तैनात आहे. सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा पाढा ते वाचतील.

अटलबिहारी आणि अडवाणी यांचीही दीनदयाळ धामला भेट
अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदी असताना २००१ मध्ये दीनदयाळ धामला भेट दिली आहे. त्या वेळी त्यांनी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा शुभारंभ केला होता. २००२ मध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही येथे दौरा केला होता.

कार्यक्रमाची रूपरेषा
मोदी सोमवारी दुपारनंतर ३.४५ वाजता हेलिकॉप्टरने दीनदयाळ धाम हेलिपॅडवर पोहोचतील. येथून ते ३.५५ वाजता पं. दीनदयाळ स्मारकाकडे जातील. तेथे ते तीस मिनिटे थांबतील. यानंतर ४.३० वाजता त्यांचे भाषण होईल. सायंकाळी ६.०५ वाजता दिल्लीला रवाना होतील.

२५० सभांचे आयोजन
मोदी यांच्या सभेसोबतच जनकल्याण पर्वाला सुरुवात होणार आहे. या काळात रालोआ सरकार सत्ता स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. साधारण २५० सभांमधून पक्षाचे नेते लोकांना यशाची माहिती देतील. छोट्या-छोट्या सभांचेही आयोजन होणार आहे. पक्ष पाचशे पत्रकार परिषदा घेणार आहे.
आप सरकारचे शंभर दिवस पूर्ण
नवी दिल्ली - दिल्लीत आम आदमी पार्टीच्या सरकारने रविवारी १०० दिवस पूर्ण केले आहेत. या काळात नायब राज्यपालांसोबतचा वाद, पक्षातील फूट आणि दर महिन्यास २० हजार लिटर मोफत पाणीपुरवठा तसेच वीज बिलात ५० टक्के सवलत आदी मुद्दे केंद्रस्थानी राहिले. सरकारने भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन क्रमांक १०३१ सुरू केला आहे. नागरिक या क्रमांकावर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवू शकतील. सरकारची उपलब्धता सांगण्यासाठी पक्षाने सेंट्रल पार्कमध्ये सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच बेकायदा झोपडपट्ट्या नियमित करण्यास सुरुवात केली. के.के. शर्मा यांच्या दहा दिवसांच्या रजेच्या कालावधीत नजीब जंग यांनी शकुंतला गामलिन यांची त्यांच्या जागी नियुक्ती केली. या निर्णयावरून केजरीवाल आणि जंग यांच्यातील वाद विकोपाला गेला. केजरीवाल यांनी जंग यांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
बातम्या आणखी आहेत...