आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NARENFRA MODI TOLD SECOND GREEN REVOLUTION IN PATANA

बिहार दौरा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कृषी क्षेत्रातील संशोधकांना पुढे येण्याचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- देशाला दुसऱ्या हरितक्रांतीची आहे. परंतु त्यासाठी देश मुळीच प्रतीक्षा करू शकत नाही. क्रांतीची सुरूवात पूर्वेकडील राज्यांतून होईल. त्यामध्ये संशोधकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.

कृषी क्षेत्रातील पायाभूत संशोधन संस्था आयसीएआरच्या ८७ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात पंतप्रधान बोलत होते. समारंभाला मोठ्या संख्येने कृषी शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. देशाला पहिल्या हरित क्रांतीचा फायदा झाला. परंतु आता देश दुसऱ्या क्रांतीची प्रतीक्षा करत बसणार नाही. आपल्याला अगोदरच खूप विलंब झाला आहे. म्हणूनच दुसऱ्या क्रांतीसाठी आपल्याला पुरेशी तयारी करायला हवी. बिहार, पश्चिम बंगाल, आेडिशा, आसाम, पूर्व उत्तर प्रदेशातून क्रांतीची सुरूवात होईल, याची मला खात्री वाटते. खरीप हंगामात डाळ आणि तेलबियांचे उत्पादन घेण्याचा सल्ला गांभीर्याने घेतल्याबद्दल मोदी यांनी प्रारंभी शेतकऱ्यांचे आभार मानले. त्याचबरोबर राज्यात कपाशीचे क्षेत्र वाढले पाहिजे. कृषी कचऱ्याचा योग्य वापर करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. अन्न प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञान आल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्याची भरच पडेल. दरम्यान, व्यासपीठावर राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी, मुख्यमंत्री नितीश कुमार, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची उपस्थिती होती.

चतुर्क्रांतीची आवश्यकता
देशाला चतुर्क्रांतीची गरज आहे. तिरंग्यात अशोक चक्राचा निळा रंग आहे. तो चौथा आहे. देशात हरित, केशरी, श्वेत आणि निळी क्रांती व्हायला हवी. केशरी रंगांचा अर्थ अनेकदा चुकीचा काढला जातो. ते ऊर्जेचे प्रतीक आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विजेची पुरेशी उपलब्धता हवी. बिहारला अधिकाधिक वीज मिळावी म्हणून आपण त्याची बाहेरून व्यवस्था करत आहोत. राज्याला नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात वीज मिळेल. श्वेत क्रांती तितकीच गरजेची आहे. पशूंच्या तुलनेत दुधाचे उत्पादन होत नाही. डेअरी क्षेत्राचे आधुनिकीकरण व्हावे. आता मत्स्य उत्पादनावरही लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. ही निळी अर्थात चतुर्क्रांती ठरेल. बिहारला दरवर्षी आंध्र प्रदेशातून ४०० कोटी रुपयांचे मासे आयात करावे. लागतात, याकडे मोदींनी लक्ष वेधले.
‘लॅब टू लँड’ मंत्र
संशोधक प्रयोगशाळेत नवीन तंत्रज्ञान विकसित करतात. परंतु माझे तंत्रज्ञान शेतापर्यंत कसे पोहाेचेल, शेतकऱ्याला त्याचा लाभ कसा मिळवता येईल. यासाठी देखील आगामी काळात संशोधकांना प्रयत्न करावे लागतील. अर्थात लॅब टू लँड धर्तीवर संशोधकांनी आपले कार्य करायला हवे, असे मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.