आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या यात्रेकरूंना लुधियानात अडवले,परिवहन कर न भरल्याने ठोठावला दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - नाशिकमधून सुमारे 150 यात्रेकरूंना घेऊन उत्तर भारतात यात्रेला गेलेल्या तीन बसेसना पंजाबचा परिवहन कर न भरल्याप्रकरणी लुधियाना जिल्हा परिवहन अधिका-यांनी सोमवारी 1.62 लाखांचा दंड ठोठावला. मात्र, तेवढे पैसे नसल्याने या यात्रेकरूंना एक दिवस येथील बसस्थानकावरच घालवावा लागला. अखेरीस स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे एक पैसाही न घेता अधिका-यांनी मंगळवारी सायंकाळी त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली.
नाशिकचे यात्रेकरू तीन बसेसद्वारा 15 जून रोजी एकूण 35 दिवसांच्या यात्रेवर निघाले. अमरनाथचे दर्शन घेऊन हे ते पंजाबमार्गे हरिद्वारला निघाले होते. सोमवारी सायंकाळी जालंधर येथून जात असताना जकात नाक्यावर लुधियाना परिवहन अधिका-यांच्या पथकाने त्यांना अडवले.


पंजाबचा परिवहन परवाना घेतल्याची पावती नसल्याने परिवहन अधिका-यांनी त्यांना एक लाख 62 हजार रुपयांचा दंड ठोकला. इतक्या मोठ्या रकमेचा दंड भरण्याएवढे पैसे नसल्याने आणि परिवहन अधिकारीही मागे हटत नसल्याने सर्व 150 यात्रेकरू लुधियाना बसस्थानकावर अडकून पडले होते.


भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथच्या यात्रेदरम्यान त्यांचे सहकारी विश्वनाथ बबन दिघे यांचा आजारपणामुळे वाटेतच मृत्यू झाला होता. त्या वेळी समवेतच्या सर्व भाविकांनी स्वत:कडील पैसे गोळा करून दिघे यांचे पार्थिव त्यांच्या पत्नीसोबत नाशिकला पाठवण्यास मदत केली होती. पंजाबच्या अगोदर ज्या-ज्या राज्यात ते पोहोचले त्या सर्व ठिकाणी त्यांनी परमिट भरले होते. मात्र, दिघेंना आर्थिक मदत दिल्यानंतर पंजाब राज्याचे
परमिट व पथकर भरण्यासाठी त्यांच्याकडील पैसे कमी पडले होते.


विहिंप, शिवसेना कार्यकर्त्यांची मदत
लुधियानातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवसेनेचे नेते आर. डी. पुरी मदतीला धावून आले. तसेच तेथील ट्रान्सपोर्टर पुरणसिंग, परबतसिंग यांनीदेखील सर्व 150 लोकांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली. या सर्वांच्या प्रभावामुळे एकही पैसा न घेता आम्हाला सोडण्यात आल्याचे प्रवासी मुरलीधर पांडव आणि राजयात्रा कंपनीचे संचालक प्रकाश मगर यांनी सांगितले.