आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात दोन बॉस, खरा कोण? नरेंद्र मोदींचे सोनिया गांधी, मनमो‍हनसिंगवर टीकास्त्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माधोपूर (पंजाब) - भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांनी रविवारी निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. देशात सध्या दोन बॉस आहेत, खरा कोण हे ओळखणे कठीण आहे, अशा शब्दांत मोदी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग व यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. काश्मिरी तरुणाईला देशाशी जोडण्याच्या मुद्द्यावर भर देतानाच जुन्या मित्रपक्षांचा संदर्भ देऊन पक्षांचीच नव्हे, तर मनांचीही बांधणी करणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.


जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 60 व्या बलिदानदिनी काश्मीर सीमेलगतच्या माधोपुरात भाजपची संकल्प रॅली झाली. मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांचा नामोल्लेख एकदाही केला नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची मात्र आठवण काढली. रालोआच्या राजवटीत वाजपेयींनी काश्मिरी तरुणांसाठी केलेल्या कार्याची आठवण त्यांनी करून दिली. काश्मिरी पंडितांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही देतानाच वाजपेयी यांचे अधुरे राहिलेले काम पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून मोदी म्हणाले की, काश्मिरातील थंड वातावरण सोडून येथील 300 मुली राजस्थानातील कोटा येथे शिक्षण घेत आहेत. यावरूनच देशाच्या विकासात योगदान देण्याची त्यांची इच्छा असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

पाकशी संबंधांवर प्रश्नचिन्ह
पाकिस्तानी तुरुंगात सरबजित सिंगचा मृत्यू झाला. त्यावर पंतप्रधानांनी काय केले, असा सवाल मोदी यांनी केला. सरबजितची घटना आणि भारतीय जवानाचे शीर कापून नेल्याच्या घटनेनंतरही सरकारने पाकचे तत्कालीन पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांना जयपूरमध्ये मेजवाणी का केली, असा जळजळीत प्रश्नही मोदींनी विचारला.
काँग्रेसकडून आक्षेप
सैनिकांसंबंधी मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी आक्षेप घेतला. उत्तराखंडमध्ये मदतकार्यात गुंतलेल्या जवानांचे मनोबल यामुळे खचू शकते, असे माकन म्हणाले.
काँग्रेसचा आक्षेप : सैनिकांसंबंधीच्या मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी आक्षेप घेतला. मदतकार्यात गुंतलेल्या जवानांचे मनोबल यामुळे खचू शकते, असे माकन म्हणाले.


कलम 370 रद्द करा - अडवाणी : काश्मिरातील 370 वे कलम रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. यामुळे काश्मीरला देशाशी जोडण्यास मदत होईल, असे त्यांनी ब्लॉगवर म्हटले आहे. मुखर्जी यांच्या ‘देश में दो प्रधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे’ या घोषणेची पूर्तता कधी होईल याची देश वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


मोदींना पीएमपदासाठी प्रोजेक्ट वगैरे केलेले नाही : गडकरी
पक्षाकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी प्रोजेक्ट करण्याचे अद्याप काहीही ठरलेले नाही. भाजप व्यक्तिवादी नसून, वैचारिक पक्ष आहे, असे पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी रविवारी स्पष्ट केले. मोदींच्या वर्चस्वामुळे अडवाणींची नाराजी किंवा पक्षातील विरोधी स्थिती वगैरे काहीही नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.