कासगंज (उत्तरप्रदेश) - येथे एका तलवारबाज (फेंसिंग) राष्ट्रीय खेळाडूला महिला कोचमध्ये गेल्यामुळे रेल्वे पोलिसांनी चालत्या रेल्वेतून फेकले, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तलवारबाज खेळाडूची आजारी पत्नी महिला कोचमध्ये होती, तिला भेटण्यासाठी तो त्या कोचमध्ये गेल्याने रेल्वे पोलिसांनी त्याच्यासोबत वाद घातला आणि लाच मागितली. त्याला खेळाडूने नकार दिल्यानंतर त्याला चालत्या रेल्वेतून फेकण्यात आले.
काय आहे प्रकरण
राष्ट्रीय खेळाडू होशियारसिंह उर्फ रॉकी (23) कौटुंबिक सोहळ्यानिमीत्त कासगंज येथे गेला होता. परतीच्या प्रवासादरम्यान त्याच्या पत्नीची प्रकृती बिघडली. त्यामुळे ती महिला कोचमध्ये होती. होशियार पत्नीला पाहाण्यासाठी महिला कोचमध्ये गेला. तिथे ड्यूटीवर असलेल्या जीआरपीच्या दोन जवानांनी महिला कोचमध्ये बसण्यासाठी त्याच्याकडे 200 रुपये लाच मागितली. मात्र होशियारने त्यांना नकार दिला. यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी होशियारला चालत्या गाडीतून फेकून दिले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जीआरपीचे दोन जवान आणि एक बुकिंग क्लर्क यांचा समावेश आहे. दोन्ही जवान फरार आहेत. होशियार मथुरेचा राहाणार होता. त्याने 2005 मध्ये केरळमध्ये आयोजित अंडर 17 राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावले होते.
बुकिंग क्लर्कने जवानांना पळून जाण्यात केली मदत
होशियारच्या पत्नीचा आरोप आहे, की गाडी थांबल्यानंतर संतप्त प्रवाशांनी जीआरपी जवानांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र एका बुकिंग क्लर्कने त्यांना पळून जाण्यास मदत केली. दुसरीकडे, जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी होशियारसिंहच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. अधिकारी म्हणाले, होशियार पाणी घेण्यासाठी स्टेशनवर उतरला होता आणि गाडी सुरु झाल्यामुळे गाडीत चढताना ही दुर्घटना झाली आहे.