आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nation's First Governmental Resignation Over Whatsapp

व्हॉट्सअॅपवर देशात पहिला सरकारी राजीनामा, फौजदाराने नोकरी सोडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिसांनी गेल्या महिन्यातच व्हॉट्सअॅप हेल्पलाइन सुरू केली होती. लोकांना लवकर मदत मिळावी, हा त्याचा उद्देश होत. मात्र, या हेल्पलाइनवर मंगळवारी देशातील पहिला सरकारी राजीनामा "पोस्ट' झाला. सर्कल अधिकाऱ्याने (सीओ) झापल्यानंतर कानपूर ग्रामीणच्या एका सब - इन्स्पेक्टरने (एसआय) संतापून हे पाऊल उचलले.
राजीनाम्यात त्याने लिहिले...
महोदय, मी रसूलाबाद ठाणे परिसरात झाडाखाली बसून जनतेच्या तक्रारी ऐकत होतो. इतक्यात माझ्याजवळ कॉन्स्टेबल कृष्णकुमार पांडेय आले. त्याला बहेलियनपुरवा गावात राहणाऱ्या चंदाच्या तक्रारींबाबत काही विचारायचे होते. दरम्यान, सीओ रमेशचंद्र विद्यार्थी ठाण्याच्या निरीक्षणासाठी आले. मी त्यांना पाहून नमस्कार करण्यासाठी झाडाखालून ठाण्यात गेलो. मात्र, ते मला पाहताच भडकले. अर्वाच्य शब्दांत बोलत होते. मला काहीच बोलू दिले नाही, ना माझे काही ऐकले. म्हणाले - तू या महिलेची (चंदा) तक्रार का नोंदवून घेतली नाही. त्यावर मी म्हणालो, ही महिला इतक्यातच ठाण्यात आली आहे. मात्र, सीओंनी काहीही ऐकले नाही. त्यांनी तिला विचारले. तिने सांगितले, मी प्रथमच ठाण्यात आले आहे. मध्येच कॉन्स्टेबल पांडेय म्हणाले की, महिलांची एफआयआर महिला कॉन्स्टेबलकडूनच नोंदवण्याचे आदेश आहेत. यावर सीओसाहेबांनी पुन्हा ओरडून विचारले, कुठाय आदेश? मग माझ्याकडे पाहून म्हणाले, पहिल्या दिवसापासूनच तुला धडा शिकवू पाहत होतो, आज संधी आली. नोकरी कशी करावी, हे दाखवून देईन. तू नोकरी कसे करताे ते पाहतोच.

त्यातच ठाण्यात तक्रारी देण्यासाठी इतरही लोक आले. सीओसाहेबांनी त्यांनाही शिवीगाळ करत पिटाळले. ही घटना ठाण्यातील पोलिस कर्मचारी व इतरांनीही पाहिली. मीही सीओसाहेबांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले असते तर तेथील लोकांच्या मनातील पोलिसांची प्रतिमा डागाळली असती. अशी बेइज्जती सहन करून नोकरी करणे मला शक्य नाही. म्हणून माझा राजीनामा स्वीकार करण्याची कृपा करावी, ही विनंती.
- विनोदकुमार, सब-इन्स्पेक्टर, रसूलाबाद ठाणे, कानपूर ग्रामीण

याबाबतीत कानपूरचे आयजी आशुतोष पांडेय यांचे म्हणणे आहे की, व्हॉट्सअॅपवर राजीनामा मिळाला असला तरी तो स्वीकारण्यात आलेला नाही. प्रकरणाचा तपास केला जात आहे. सध्या विनोदकुमार यांची झाशी सर्कलमध्ये बदली करण्यात आली आहे.