आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नटसम्राट’, ‘रिंगण’ने गोवेकर प्रेक्षक हेलावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोव्याची राजधानी पणजी येथे सुरू असलेल्या ४७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी) सध्या मध्यकाळ गाठलाय. मात्र, एकाहून एक दर्जेदार चित्रपटांची पर्वणी अद्यापही जोरात आहे. मागील तीन दिवस प्रेक्षकांना कोरियन थरारासोबत मराठीतील ‘रिंगण’ अाणि ‘नटसम्राट’ या बहुचर्चित चित्रपटांची मेजवानी मिळाली. ‘टनल’ आणि ‘अॉफिस’ या कोरियाच्या दोन थरारपटांनी तर सिनेप्रेमींना भुरळच घातली आहे. इफ्फीच्या आवारात प्रदर्शनाच्या दिवशी केवळ या दोनच थरारपटांची चर्चा होती. यंदा ‘कंट्री फोकस’मध्ये दक्षिण कोरियावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर इफ्फीच्या विविध प्रवर्गांमध्ये कोरियन चित्रपटांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. कोरियन दिग्दर्शक ली यांच्या मते, हा सन्मान आमच्यासाठी खूप आनंददायी तर आहेच. मात्र, भारतातील समीक्षक रसिकांसमाेर आमच्या चित्रपटांना दाखविले जात असल्याचे प्रचंड समाधान आहे.
मराठी चित्रपटास पुन्हा रेड कार्पेट : इफ्फीच्या या पर्वात मंगळवारी आणि बुधवारी पुन्हा मराठी चित्रपटांसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले . त्यावर महेश मांजरेकर पत्नी मेधा यांच्यासह नटसम्राटचे निर्माते विश्वास जोशी, रिंगणचे अभिनेते शशांक शिंदे, किशोर कदम, दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल साने यांनी हजेरी लावली.
‘आॅफिस’: कार्यालयीन स्पर्धेचा संघर्ष
हाँग वॅन चॅन दिग्दर्शित “आॅफिस’ या चित्रपटात कार्यालयात असलेला कामाचा ताण, कर्मचाऱ्यांमधील स्पर्धा आणि त्याच्या परिणामातून झालेली हत्या याचे रहस्य मांडण्यात आले आहे. एक सामान्य प्रवृत्तीचा व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबीयांची हत्या करून सहकाऱ्यांवर निशाणा साधतो, याचे अत्यंत रहस्यमयी चित्रण कोरियाई चित्रपटांचा एक वेगळाच अंग दाखवून जाते. याचे दृश्यचित्रण, मिश्रण आणि तंत्रज्ञान वापर अप्रतिम असून आधुनिक कोरियातील शहरी आणि कार्यालयीन दृश्यात्मकता एका वेगळ्याच भावविश्वात नेऊन सोडते.
‘टनल’ : बोगद्यातील विलक्षण थरार
किर्र अंधारात दडून गेलेल्या बोगद्यात घडणारा थरार ‘टनल’ या कोरियाई चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अचानक कोसळलेल्या कारमध्ये अडकून पडलेल्या व्यक्तींचा जगण्यासाठीचा संघर्ष तसेच बाहेरील लोकांची अडकलेल्यांना काढण्यासाठीची धडपड अत्यंत रोमांचकपणे चित्रित करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत हॉलीवूडपटांनाही लाजवणारा किम सिआँग हूम दिग्दर्शित हा चित्रपट प्रत्येक सेकंदाला रसिकांना खुर्चीशी खिळवून ठेवतो. इतकेच नव्हे तर माध्यमे, राजकारण आणि लोकांच्या मानसिकतेवर मारलेली कोपरखळीही लोकांना विचार करायला भाग पाडते.
‘रिंगण’, ‘नटसम्राट’ची जादू कायम
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘रिंगण’ आणि महान नाटकावर आधारित ‘नटसम्राट’या चित्रपटांची जादू इफ्फीतही पाहायला मिळाली. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे बापलेक यांची विलक्षण कथा असलेला रिंगण आणि दुसरीकडे नात्यांमधील स्वार्थ, ताटातूट आणि विश्वासघातावर आधारित असलेला ‘नटसम्राट’ प्रेक्षकांना प्रचंड भावल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांतून व्यक्त होत होते. मिरामार समुद्रकिनाऱ्यावर नटसम्राटचे सादरीकरण झाले, तर आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये अगदी हाऊसफुलच्या पाटीसह रिंगणचे प्रदर्शन झाले.
बातम्या आणखी आहेत...