आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naxal Photographer Was There At The Time Of Attack

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यावेळी हजर होता फोटोग्राफर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - दरभा येथे गेल्या शनिवारी काँग्रेसच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी सर्वप्रथम दाखल होणारा तो युवक कोण होता? याचा शोध सुरु झाला आहे. नक्षलवाद्यांनी जिरम येथे जो मृत्यूंचा तांडव केला, त्यांनतर काही मिनीटांमध्येच एक मोटरसायकलस्वार तिथे आला. त्याच्याजवळ अत्याधुनिक कॅमेरा होता. त्याने पटापट फोटो घेण्यास सुरुवात केली. महेंद्र कर्मा यांच्या मृतदेहाचे त्याने अनेक अँगलमधून फोटो घेतले. काही मिनीटांतच काम पूर्ण करून तो जिरमच्या जंगलात फरार झाला.

दरभा येथे झालेल्या अंदाधुंद गोळीबारानंतर जखमी आणि हल्ल्यातून बचावलेले काँग्रेस नेते-कार्यकर्ते तसेच पोलिस रस्त्यावर जीव वाचवण्यासाठी पडून होते. नक्षलवाद्यांनी जाताजाता त्यांना गुपचूप पडून राहा अशी ताकिद दिली होती. ते गेल्यानंतर पुढच्या पाच मिनीटांमध्येच एक मोटरसायकलस्वार तिथे आला. मोटरसायकल रस्त्याच्या कडेला उभी करून त्याने खांद्याला लटकवलेल्या पिशवीतून कॅमेरा काढला आणि जमीनीवर झोपलेल्या सर्वांचे फोटो घेऊ लागला. त्यानंतर तो सरळ माजी मंत्री महेंद्र कर्मा यांच्या मृतदेहाजवळ गेला. तिथे त्याने अनेक फोटो घेतले. कोणाशी काहीही न बोलता तो परत मोटरसायकलच्या दिशेने निघाला, तेव्हा काँग्रेस नेते चंद्राकर यांनी त्याला तू कोण आहेस, अशी विचारणा केली होती. मी प्रेस फोटोग्राफर आहे, हे एका वाक्यात उत्तर देऊन त्याने गाडी स्टार्ट केली आणि जिरमच्या जंगलात निघून गेला. त्यानंतर हा फोटोग्राफर कोणालाही दिसलेला नाही.

काँग्रेस नेत्यांकडून अज्ञात फोटोग्राफरचा उल्लेख झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यांनी त्याच्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून, तो नक्षलवाद्यांचा फोटोग्राफर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो कोणत्या मोटरसायकलवर आला होता. तिचा क्रमांक काय होता. याचीही माहिती नाही. त्या क्षणाला या गोष्टी तपासण्याची संधीच मिळाली नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. जाताजाता तो, मी प्रेस फोटोग्राफर आहे. हे एकच वाक्य बोलल्यामुळे तो नेमका कुठला होता, याचाही अंदाज आला नाही. मात्र, त्याचा चेहरा पाहिलेल्यांच्या मते, तो छत्तीसगढमधील नसून बाहेरच्या राज्याचा असण्याची शक्यता जास्त आहे.