आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नक्षलवाद्यांकडून कंत्राटदाराच्या मुलाचे अपहरण करून हत्या; रेल्वे प्रकल्पास विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- एका कंत्राटदाराच्या मुलाचे अपहरण करून त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची घटना कांकेर जिल्ह्यात घडली. या मुलाचे कांकेर जिल्ह्यात सुरू असलेल्या रेल्वे विभागाच्या बांधकामाच्या साइटवरून शनिवारी अपहरण करण्यात आले होते. अपहरण करण्यात आलेल्या रमेश जैन (३८) याचा मृतदेह रेखाबत जिल्ह्यातील एका जंगलात रविवारी सकाळी आढळला, अशी माहिती कांकेरचे पोलिस अधीक्षक के. एल. ध्रुव यांनी सांगितली.  


मृताच्या मुलाचे वडील दरबारी राम यांना रेल्वे मार्गात  येणाऱ्या जंगल परिसरातील झाडे कापण्याचे कंत्राट मिळालेले आहे. नियोजित दल्लीरझारा ते रावघाट  रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. वन विभागाच्या डेपोतील साहित्याचीही ते वाहतूक करतात.  


शनिवारी रमेश जैन जंगलातून लाकडे वाहून नेण्यासाठी रेखाबत गावात गेला होता. तेथे सशस्त्र नक्षलवादी आले. कामावरील मजुरांना तेथून निघून जाण्याचे फर्मान सोडले. त्यांनी कामावरील चार ट्रक आणि एका क्रेनसह रमेशचे अपहरण केले. त्यानंतर काही वेळातच रमेशची जंगल परिसरात गोळ्या घालून हत्या केली. नक्षलवादी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर बस्तर भागात माओवाद्यांचा शोध सुरू आहे.  


माओवाद्यांचा रेल्वे प्रकल्पास विरोध

दल्लीरझारा-रावघाट-जगदलपूर  २३५ किमी लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या उत्तर बस्तरमधून लोखंड वाहून नेण्याचे काम सुरू आहे. 


रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर अाहे. या कामाचा ९५ किमी लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेमार्गाचे काम सुरू झाल्याने बस्तर जिल्ह्याचा विकास होईल व या भागातून नक्षल्यांचे उच्चाटन होईल, अशी भीती माओवाद्यांना वाटते. त्यामुळे या प्रकल्पास त्यांचा अाधीपासूनच विरोध आहे. त्यामुळे रमेश जैन याची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...