आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच; पणतूचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैपेईच्या विमान अपघातातच झाला हे सिद्ध करणारे विश्वासार्ह पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा नेताजींचे पणतू आणि संशोधक आशिष रे यांनी रविवारी केला. रेंकोजी मंदिरातील नेताजींच्या अस्थी भारतात परत आणाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

रे म्हणाले की, नेताजींचा मृत्यू १९४५ च्या विमान अपघातातच झाला आणि त्यांना सोव्हिएत संघात प्रवेश करण्याची संधीच मिळाली नाही, हे स्पष्टपणे दर्शवणारे तीन अहवाल आहेत. त्यांचा मृत्यू अपघातातच झाला आहे, हे जपान सरकारच्या दोन अहवालांत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
तिसरा अहवाल रशियाच्या सरकारी आर्काइव्हजमध्ये असून नेताजींना तत्कालीन सोव्हिएत संघात १९४५ मध्ये किंवा त्यानंतर कधीही प्रवेश करण्याची संधी मिळालेली नाही, असे त्यात म्हटले आहे. त्यांना सोव्हिएत संघात कैदी म्हणून ठेवण्यात आलेच नव्हते.
रशिया हा कम्युनिस्ट देश आहे. ब्रिटिशांच्या राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तो देश आपल्याला मदत करेल, असे नेताजींना नेहमीच वाटत होते. त्यामुळे त्यांचा रशियाला जाण्याचा विचार असावा.
जपानने शरणागती पत्करली आहे. त्यामुळे तो देश आपले संरक्षण करू शकणार नाही, असे त्यांना वाटत होते. रशियात कदाचित आपल्याला अटक केली जाईल, पण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामासाठी आपल्याला सोव्हिएत रशियात जास्त संधी मिळतील, असेही त्यांना वाटत होते, असे रे यांनी नमूद केले. अनेक दशकांपासून त्यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे.

अस्थींची डीएनए चाचणी करा

नेताजींबद्दलची भावनिक जवळीक आपण समजू शकतो, पण सत्याला सामोरे जाण्याचीही गरज आहे, असे नमूद करून रे म्हणाले की, नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच झाला याकडे अंगुलीनिर्देश करणारे अनेक पुरावे आहेत, तरीही आपण किती काळ ते नाकारणार आहोत? माझ्या मते, शक्य असेल तर रेंकोजी मंदिरातील अस्थींची डीएन चाचणी करावी आणि त्या अस्थी भारतात आणाव्यात.
बातम्या आणखी आहेत...